26.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home विदर्भ तिरोड्याच्या मुख्य चौकातून जाळीसह बदामाचे झाड लांबवले; ‘ग्रीन फाउंडेशन’च्या मोहिमेला गालबोट

तिरोड्याच्या मुख्य चौकातून जाळीसह बदामाचे झाड लांबवले; ‘ग्रीन फाउंडेशन’च्या मोहिमेला गालबोट

0
9

चित्रा कापसे, तिरोडा:शहर हिरवेगार आणि सुंदर बनवण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांवर चोरट्यांनी पाणी फेरल्याचा धक्कादायक प्रकार तिरोड्यात उघडकीस आला आहे. शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि पोलीस ठाण्याजवळील मुख्य चौकातून चोरट्यांनी चक्क लोखंडी जाळीसह ९ फूट उंचीचे बदामाचे झाडच लांबवले आहे. या घटनेमुळे शहराच्या हरित संकल्पनेला मोठा धक्का बसला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी ‘ग्रीन फाउंडेशन तिरोडा’ ही संस्था गेल्या ८०४ दिवसांपासून दररोज उपक्रम राबवत आहे. संस्थेने आतापर्यंत शहरात सुमारे ३ हजारांहून अधिक झाडांची लागवड करून त्यांचे जतन केले आहे. याच मोहिमेअंतर्गत टीमने १६ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्याजवळील मुख्य चौकात, मिर्झा पान पॅलेसच्या बाजूला ९ फूट उंचीचे बदामाचे झाड लावून त्याच्या संरक्षणासाठी ८ फूट उंचीची टणक लोखंडी जाळी बसवली होती.

पोलीस ठाण्याजवळच धाडस!

२२ ऑगस्टच्या रात्री ११ ते २३ ऑगस्टच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने हे झाड मुळासकट उखडून जाळीसह पळवून नेले. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने चोरट्यांच्या धडसाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

“लोकांच्या चोरीची पातळी इतकी खालावली आहे की, आता झाडेही सुरक्षित राहिलेली नाहीत. स्व खर्चाने झाड घेऊन लावण्याची तयारी नाही, सर्वकाही फुकट बळकावण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया ग्रीन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, संस्थेच्या प्रतिनिधींनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. प्रशासनानेही तात्काळ तपासाचे आश्वासन दिले आहे. सार्वजनिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची अशी नासधूस होत असल्याने नागरिकांनीही अशा घटनांविरोधात सतर्क राहावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.