चित्रा कापसे, तिरोडा:ई-पीक नोंदणीची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच स्वतःच्या मोबाईलवरून ऑनलाईन ई-पीक नोंदणी करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी डोंगरगाव (खडकी) ग्रामपंचायतीचे सरपंच शिशुपाल पटले यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
सन २०२६ पासून महसूल विभागाने गावागावांत ई-पीक नोंदणीसाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. मात्र, गावातील शेकडो शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी एकाच कर्मचाऱ्यावर असल्याने निर्धारित कालावधीत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे कठीण होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ई-पीक नोंदणीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अनेक गावांतील जमिनींमुळे शेतकरी हैराण
अनेक शेतकऱ्यांची शेती वेगवेगळ्या गावांच्या हद्दीत पसरलेली आहे. त्यामुळे त्यांना नोंदणीसाठी प्रत्येक गावातील संबंधित कर्मचाऱ्याशी स्वतंत्र संपर्क साधावा लागत आहे. यात शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैशांचा अपव्यय होत असून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, एकाच कर्मचाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण येत असल्याने यंत्रणेवरही ताण निर्माण झाला आहे.
‘स्वतः ई-पीक पाहणीचा अधिकार द्या’
“पूर्वी शेतकरी आपल्या मोबाईलद्वारे शेतात जाऊन स्वतः ई-पीक नोंदणी करू शकत होते. त्यामुळे शेतकरी आपल्या वेळेनुसार ही नोंदणी जलदगतीने पूर्ण करत असत. शासनाने ही जुनी पद्धत पुन्हा सुरू करून आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी सरपंच शिशुपाल पटले यांनी केली.
शासनाने नियुक्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था कायम ठेवून शेतकऱ्यांनाही स्वतःहून मोबाईलवरून नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिल्यास ही मोहीम अधिक गती घेईल. तसेच एकापेक्षा अधिक गावांत जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकात्मिक (इंटीग्रेटेड) नोंदणी प्रणाली विकसित करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. “शेतकऱ्याला सक्षम करा आणि त्याला स्वतःची ई-पीक नोंदणी करण्याचा अधिकार द्या,” या भूमिकेतून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





