26.3 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ स्वच्छता व नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी नगरपंचायतीने आधुनिक यंत्रणा उभारावी – आमदार राजकुमार...

स्वच्छता व नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी नगरपंचायतीने आधुनिक यंत्रणा उभारावी – आमदार राजकुमार बडोले

0
12

सडक अर्जुनी नगरपंचायतीत स्वर्गरथ व सेप्टिक टँक सक्शन वाहनाचे लोकार्पण
सडक अर्जुनी -नगरपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या व तत्पर सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नव्याने सेवेत दाखल करण्यात आलेल्या स्वर्गरथ तसेच “शोषण टँकर” (सेप्टिक टँक सक्शन वाहन) यांचे लोकार्पण आमदार इंजी. राजकुमार बडोले यांच्या हस्ते ता. २७ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले म्हणाले की, “स्वच्छता ही केवळ नगरपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांना स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आधुनिक साधनसामग्रीचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. स्वर्गरथामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, सेप्टिक टँक सक्शन वाहनामुळे सांडपाणी व सेप्टिक टँक स्वच्छतेची समस्या अधिक सुलभतेने सोडविता येईल,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, नगरपंचायतीने उपलब्ध सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक व योग्य पद्धतीने मिळवून द्यावा. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांना प्राधान्य देत सडक अर्जुनी शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्वर्गरथ व सेप्टिक टँक सक्शन वाहन सेवेत दाखल झाल्यामुळे सडक अर्जुनी परिसरातील नागरिकांना विशेषतः अंत्यविधीच्या वेळी तसेच सेप्टिक टँक व सांडपाणी व्यवस्थापनासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे.
लोकार्पण कार्यक्रमाला नगरपंचायत अध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, नगरपंचायत सभापती शाहिस्ताताई शेख, कमलादेवी अग्रवाल, सायमाताई शेख, नगरपंचायत मुख्याधिकारी सारंग खांडेकर, नगरसेवक देवचंद तरोने, महेंद्र वंजारी, अंकित भेंडारकर, असलेश अंबादे, गोपीचंद खेडकर, विशाल शहारे, राजकुमार हेडाऊ, नगरसेविका शशिकलाताई टेम्भूरने, दीक्षाताई भगत, रजनी परिहार, रेणू अग्रवाल तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशिवार, नगरपंचायत कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.