> जिल्हा क्रीडा कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
वाशिम,दि.२८ ऑगस्ट :हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त अर्थात राष्ट्रीय क्रीडा दिन २९ ऑगस्ट रोजी वाशिम येथे राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदक पटकावलेल्या गुणवंत खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, वाशिमच्या वतीने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.क्रीडा व खेळाचा प्रसार प्रामुख्याने शहरी भागात अधिक आढळतो. जोपर्यंत ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत खेळाचे महत्त्व पोहोचत नाही आणि तेथील युवक-युवतींमध्ये क्रीडाविषयक पोषक वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत खेळाची खरी प्रगती साधता येणार नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जिल्हा क्रीडा कार्यालयाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
सन २०२५-२६ या वर्षात शालेय (मान्यताप्राप्त) राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत पदक प्राप्त केलेले संघ तसेच वैयक्तिक स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथील बॅडमिंटन हॉलमध्ये संपन्न होईल.
खेळाडूंसाठी महत्त्वाची माहिती
सन २०२५-२६ मध्ये राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवलेल्या ज्या खेळाडूंना या सत्कारात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपल्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत (झेरॉक्स) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे जमा करावे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत राज्य क्रीडा मार्गदर्शक अक्षय टेभुर्णीकर (मोबाईल नं. ९७६७११७६६६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम
* २९ ऑगस्ट २०२६ (सायंकाळी ४ वाजता): २९ चॅलेंजेस, पास द बॉल उपक्रम.राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंचा सत्कार (बॅडमिंटन हॉल, जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम).* ३० ऑगस्ट २०२६ (सकाळी ६:३० वाजता): रन अॅन्ड राऊंड (धावणे) स्पर्धा, जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम.
या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागाचे आवाहन
> क्रीडा दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांनी केले आहे.




