26.9 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ घराला भीषण आग;संसार जळून खाक-जि.प.सदस्य किरण कुमार पारधी यांच्याकडून ₹१० हजारांची तातडीची...

घराला भीषण आग;संसार जळून खाक-जि.प.सदस्य किरण कुमार पारधी यांच्याकडून ₹१० हजारांची तातडीची मदत

0
46

चित्रा कापसे/तिरोडा-तालुक्यातील घोगरा पाटीलटोला येथे काल रात्री सुमारे ९.१५ वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत श्रीमती लिलाबाई प्रकाशजी कटनकर विधवा असुन त्यांचा एक मुलगा अमोल प्रकाश कटनकर यांच्या घरातील संपूर्ण संसार जळून खाक झाला. या दुर्घटनेत अन्नधान्य, कपडे, घरातील जीवनावश्यक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे तसेच सुमारे ५० हजार रुपये रोख रक्कम जळून नष्ट झाली. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कटनकर कुटुंबावर या घटनेमुळे मोठे संकट ओढवले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य किरण कुमार पारधी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार श्री. नारायणजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाची टीम, तलाठी, कोतवाल तसेच महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री. मेश्राम व त्यांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.
घर पूर्णपणे जळाल्याने कुटुंबासमोर निवारा, अन्नधान्य आणि दैनंदिन उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थितीची दखल घेत तहसीलदारांनी राशन दुकानातून तातडीने धान्य उपलब्ध करून देण्याचे तसेच शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, शासनाची मदत मिळेपर्यंत कुटुंबाला आधार मिळावा म्हणून जि. प. सदस्य किरण कुमार पारधी यांनी स्वतःच्या पुढाकारातून ₹१० हजारांची तातडीची आर्थिक मदत केली. तसेच कुटुंबाला तात्पुरता निवारा मिळावा यासाठी आदिवासी नवनिर्मित भवनात राहण्याची व्यवस्था करण्याबाबतही सूचना करण्यात आली.यावेळी सरपंच प्रीतीबाई भांडारकर, पप्पू भांडारकर, अशोक भांडारकर, अरुणजी खरोदे, ग्रामविकास अधिकारी श्री. प्रमोदजी, महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस पाटील, तलाठी, महावितरणचे अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
“संकटग्रस्त कुटुंबाला केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मदत करणे आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हीच माझी जबाबदारी आहे. या कुटुंबाला शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक मदत, अन्नधान्य व निवाऱ्याची सुविधा मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील,” असे किरण कुमार पारधी यांनी सांगितले.या प्रसंगातून संकटाच्या काळात लोकप्रतिनिधीने दाखविलेली तत्परता आणि माणुसकीची भूमिका अधोरेखित झाली आहे.