गोंदिया:मित्राच्या वाढदिवसाच्या आनंदाला दारूच्या नशेत लागलेले गालबोट थेट रक्तरंजित थरारात बदलल्याची धक्कादायक घटना गोंदिया शहरात घडली आहे. कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याच्या क्षुल्लक रागातून एका ३२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. शहरात घडलेल्या या हत्याकांडामुळे एकदंत कॉलनी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.मिथून भैयालाल ठाकरे (वय ३२, रा. नवा टोला, नागरा) असे मृत तरुणाचे नाव असून, संदीप देवदास मेश्राम (रा. कटांगी टोला) असे हत्येचा आरोप असलेल्या संशयिताचे नाव आहे.
वाढदिवसाची पार्टी अन् दारूची नशा
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत मिथून ठाकरे हा २८ ऑगस्टच्या रात्री आपल्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमात मद्यप्राशन केल्यानंतर तो मध्यरात्रीच्या सुमारास अंगूर बगीचा परिसरातील मोबे हॉस्पिटलजवळ असलेल्या एकदंत कॉलनी येथे गेला. तेथे त्याचा आरोपी संदीप मेश्राम याच्याशी कोणत्या तरी कारणावरून किरकोळ वाद झाला.
घर गाठून कॉलर पकडली; रागाच्या भरात घेतला जीव
हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. मध्यरात्री सुमारे १:१५ वाजताच्या सुमारास मिथून हा थेट आरोपी संदीप मेश्राम याच्या घरासमोर पोहोचला. दारूच्या नशेत असलेल्या मिथूनने संदीपची कॉलर पकडून त्याला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.अचानक घडलेल्या या घटनेमुळे संतापलेल्या संदीपचा ताबा सुटला. कॉलर पकडल्याचा तीव्र राग मनात धरून त्याने घरातून धारदार शस्त्र आणून मिथूनवर सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेला मिथून जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवीन कायद्यानुसार (BNS) खुनाचा गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) रुग्णालयात रवाना केला.या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपी संदीप देवदास मेश्राम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. ठाणेदार तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पुढील सखोल तपास करत आहे. हल्ल्यात वापरलेले शस्त्र जप्त करणे आणि घटनेमागील अधिक तपशील शोधण्याचे काम सुरु असून, या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला आहे.





