नागपूर:खाकी वर्दीचा धाक दाखवत आणि पदाचा गैरवापर करत एका पीडित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. एका राज्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या अंगरक्षकाने विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले, तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले. याप्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.अजय सदाशिव सलामे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी अंगरक्षकाचे नाव असून तो सध्या राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सुरक्षेत कार्यरत आहे.
लग्नाचे आमिष, लैंगिक शोषण अन् व्हिडीओचा धाक
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आरोपी अजय सलामे याने एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे खोटे आमिष दाखवले. त्यानंतर तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने या कृत्यांचे गुपचूप फोटो आणि व्हिडीओ क्लिप तयार करून घेतले.महिलेने जेव्हा विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे ब्लॅकमेलिंग सुरू केले. या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडित महिलेने हिंमत दाखवत रामटेक पोलीस ठाण्यात धाव घेतली.
स्वतःच्या व मुलांच्या जीवाला धोका; पोलीस अधीक्षकांची घेतली भेट
आरोपी अजय सलामे हा अत्यंत दबंग प्रवृत्तीचा असून त्याच्याकडून स्वतःच्या आणि मुलांच्या जीविताला गंभीर धोका असल्याचे पीडितेने सांगितले आहे. याप्रकरणी न्यायासाठी पीडित महिलेने थेट नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि एसडीपीओ रमेश बरकते यांची भेट घेऊन आपबीती मांडली.
रामटेक पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी अजय सलामे आणि त्याच्यासोबतच्या एका महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील:कलम ६९ (लग्नाचे खोटे आमिष दाखवून लैंगिक संबंध प्रस्थापित करणे),कलम ३५१(२) (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे),कलम ३(५) (समान उद्देशाने केलेले कृत्य)अन्वये गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यावले आणि राजकुमार थोरात या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
शासकीय शस्त्राचा धाक अन् बायकोचेही गंभीर आरोप
आरोपी अजय सलामे यापूर्वी माजी खासदार कृपाल तुमाने यांचाही अंगरक्षक म्हणून कार्यरत राहिला आहे. विशेष म्हणजे, केवळ पीडित महिलाच नाही, तर खुद्द सलामेच्या पत्नीनेही त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सलामेकडे शासकीय अग्निशस्त्र (सर्व्हिस रिव्हॉल्व्हर) असल्याने तो सतत त्याचा धाक दाखवून धमकावत असल्याचा आरोप पत्नीने केला आहे.सध्या रामटेक पोलीस या संपूर्ण प्रकरणातील सर्व आरोपांची सत्यता पडताळून पाहत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खाकी वर्दीला काळीमा फासणाऱ्या या आरोपी अंगरक्षकावर पोलीस कधी कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





