सडक अर्जुनी येथे श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या यात्रेचे उत्साहात स्वागत; चरणपादुकांचे भाविकांनी घेतले दर्शन
सडक अर्जुनी- अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम अंतर्गत केंद्रीय प्रचार विभागाच्या वतीने आयोजित यात्रेचे सडक अर्जुनी येथे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयातर्फे सौ. शारदा बडोले यांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पवित्र चरणपादुकांचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ. शारदा बडोले म्हणाल्या की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन, भजन आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक एकोपा आणि ग्रामविकासाचा संदेश दिला. त्यांचे विचार केवळ ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
राष्ट्रसंतांनी ‘गाव हा विकासाचा केंद्रबिंदू’ मानून स्वच्छ, सुंदर, सुसंस्कारी आणि स्वावलंबी गावाची संकल्पना मांडली. आजच्या बदलत्या काळातही त्यांचे विचार तितकेच उपयुक्त असून, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून समाजहिताच्या कार्यात सहभागी व्हावे. तसेच ग्रामस्थांनी एकजुटीने गावाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सौ. शारदा बडोले यांनी केले.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या चरणपादुकांचे गावात आगमन हा श्रद्धेचा आणि आनंदाचा क्षण आहे. या पवित्र यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचावेत आणि समाजात प्रेम, बंधुभाव व सेवाभाव अधिक दृढ व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी भाविकांनी राष्ट्रसंतांच्या पवित्र चरणपादुकांचे दर्शन घेऊन अभिवादन केले. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिकांनी यात्रेचे मनोभावे स्वागत करून राष्ट्रसंतांच्या विचारांना उजाळा दिला.
कार्यक्रमाला मान्यवर, श्रीगुरुदेव सेवामंडळाचे पदाधिकारी, विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सडक अर्जुनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





