लातूर जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उत्साहात
लातूर, दि. ०२ : आपल्या पारंपरिक आहारात रानभाज्यांचे महत्त्व होते. परंतु, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि आधुनिक आहार पद्धतीमुळे या आरोग्यदायी रानभाज्या आपल्या आहारातून हद्दपार होत आहेत. रानभाज्यांचे औषधी व आरोग्यदायी गुणधर्म विचारात घेता त्यांचा नियमित आहारात समावेश होणे आवश्यक आहे, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील यांनी सांगितले.
लातूर कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने कल्पतरू मंगल कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती पाटील बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या कृषि सभापती कविता गोरे, कृषि सहसंचालक महेश तीर्थकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दिलीप जाधव, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक मनिषा बांगर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी दीपक सुपेकर, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे संदीप देशमुख, आहारतज्ज्ञ डॉ. प्रियांका शेंडगे यांच्यासह कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर व पुरस्कारप्राप्त शेतकरी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिलांना रानभाज्यांच्या विक्रीसाठी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी रानभाजी महोत्सव हे एक उत्तम व्यासपीठ ठरत आहे. मात्र केवळ एक दिवसच नव्हे, तर नियमित स्वरुपात रानभाजीला बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठा हातभार लागेल. पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन करणाऱ्या महिला बचत गटांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती पाटील यांनी सांगितले.
उत्तम आरोग्यासाठी रानभाज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नामशेष होत चाललेल्या या भाज्यांचे संवर्धन आणि सेवन वाढवणे काळाची गरज आहे. यासाठी महिलांनी विशेष प्रयत्न करून आपल्या कुटुंबाच्या आहारात रानभाज्यांचा वापर वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि सभापती कविता गोरे यांनी यावेळी केले.
या प्रसंगी रानभाज्यांची सविस्तर आणि सचित्र माहिती देणाऱ्या ‘ओळख रानभाज्यांची…’ या विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्रीकृष्ण शिंदे आणि जिजामाता पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी संजीवनी नागमोडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.





