24.3 C
Gondiā
Thursday, August 27, 2026
Home मराठवाडा/खान्देश देऊळगाव गात येथील जिल्हा परिषद शाळा इमारतीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते...

देऊळगाव गात येथील जिल्हा परिषद शाळा इमारतीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

0
7
आधुनिक शिक्षण सुविधांनी सुसज्ज शाळा विद्यार्थ्यांच्या सेवेत
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व कौशल्याधारित शिक्षण देण्यावर भर
परभणी दि.२७ : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, देऊळगाव गात (ता. सेलू) येथे सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या सुसज्ज शालेय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष लता वाकळे, सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा परिषद सदस्य प्रीती डख, अजय डासाळकर, पंचायत समिती सदस्य शिवराम कदम, गटविकास अधिकारी उदय जाधव, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माऊली कदम आदी उपस्थित होते.
सन १९४३ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेत सध्या पाचवी ते दहावीपर्यंत सुमारे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध शालेय स्पर्धा, परीक्षा तसेच ज्ञान-विज्ञानविषयक उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभागी होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जात आहेत.
यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, देऊळगाव गात येथे खासगी शाळांनाही लाजवेल अशी सुसज्ज शाळेची इमारत उभी राहिली आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण त्यांच्या परिसरातच मिळावे, यासाठी अशा शाळा विकसित होणे आवश्यक आहे. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी या शाळेचा लाभ घ्यावा. शाळा सुसज्ज झाल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांची जबाबदारीही वाढली आहे.
केवळ नोकरी मिळविण्यासाठी नव्हे, तर उद्यमशीलता निर्माण करणारे शिक्षण आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनुसार त्याला विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आज विविध क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध असून, त्या संधींचे सोने करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
समाजातील सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्याच तोडीच्या शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. या शाळेतील प्रयोगशाळा, टिंक लॅब आणि डिजिटल सुविधांचा विद्यार्थ्यांनी प्रभावी वापर करून प्रयोगशील व नवोन्मेषी विचार विकसित करावा, असे आवाहन त्यांनी केले.
तालुक्यातील रोजगाराच्या संधींबाबत बोलताना पालकमंत्र्यांनी कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सेलू येथील आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यातून सुमारे ६०० युवकांना रोजगारनिर्मितीची संधी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत पालकमंत्री म्हणाल्या की, येथील मुला-मुलींना जगातील सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करून अभ्यासाकडे लक्ष द्यावे. पालक व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना रक्षाबंधनानिमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले. प्लास्टिकचा वापर टाळण्याबरोबरच शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती, मिश्रशेती आणि विविध पिकांच्या लागवडीकडे वळावे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, तसेच ‘लाडक्या बहिणी लखपती दीदी व्हाव्यात’ या उद्देशाने विविध उपक्रम राबवावेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. रेशीमशेतीसारख्या व्यवसायातून उत्पन्नवाढीच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ‘अहिल्या बचत गट भवन’ उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सोनकांबळे यांनी शाळेची वाटचाल आणि शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभल्याचे त्यांनी सांगितले. संचमान्यतेनुसार मुख्याध्यापक, दोन पदवीधर शिक्षक आणि एक शिपाई अशी एकूण चार पदे रिक्त असल्याचे नमूद करण्यात आले. शाळेसाठी संरक्षण भिंत, सीसीटीव्ही व्यवस्था तसेच परिसरातील रस्त्याचे काम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. तालुक्यात पीएमश्रीच्या दोन शाळा असून, एनएमएमएस परीक्षेत १२ विद्यार्थी पात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले. देऊळगाव गातची शाळा डिजिटल असून, प्रयोगशील विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू आहे. किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी लवकरच सॅनिटरी व्हेंडिंग मशीन बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला बचत गटांच्या माध्यमातून पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता तांबे यांनी केले. यावेळी शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.