23.4 C
Gondiā
Wednesday, September 2, 2026
Home Top News तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात तीन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू; माता व नातेवाईकांचा आक्रोश

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात तीन दिवसांच्या नवजात बालकाचा मृत्यू; माता व नातेवाईकांचा आक्रोश

0
44
, रात्रीच्या वेळी स्तनपान करताना श्वास गुदमरल्याची प्राथमिक शक्यता
गोंदिया: तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात एका तीन दिवसांच्या नवजात बालकाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांच्या समोपचाराच्या मध्यस्थीनंतर नातेवाईकांनी शवविच्छेदनास संमती दिली, ज्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यातील जमुनिया येथील एका गरोदर महिलेला २९ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेने एका निरोगी मुलाला जन्म दिला होता. प्रसूतीनंतर माता आणि बालक दोन्ही डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय कक्षात उपचार आणि निरीक्षणाखाली होते. दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते.
३१ ऑगस्टच्या रात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास बालकामध्ये कोणतीही हालचाल होत नसल्याचे मातेच्या आणि नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ऑन-ड्यूटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले. डॉक्टरांनी बालकाची तपासणी केली असता, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे माता आणि नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. घटनेची संवेदनशीलता पाहता रुग्णालय प्रशासनाने तातडीने तिरोडा पोलीस ठाण्याला माहिती दिली.
माहिती मिळताच तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील नामूर्ती आणि पोलीस कर्मचारी मोहित चौधरी तातडीने रुग्णालय आवारात दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मात्र, नवजात बालकाचे शवविच्छेदन (पोस्टामाॅर्टम) करण्यात येऊ नये, अशी भूमिका घेत नातेवाईकांनी तीव्र विरोध दर्शवला. यामुळे रुग्णालयात काही काळ कायदे-सुव्यवस्थेचा आणि तणावाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर, पोलीस अधिकारी आणि रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. शवविच्छेदन कायदेशीररीत्या किती गरजेचे आहे हे पटवून दिल्यानंतर नातेवाईकांनी संमती दिली.
स्तनपान करताना श्वास गुदमरल्याची शक्यता: वैद्यकीय अधीक्षक
या संपूर्ण प्रकरणा संदर्भात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “सुरुवातीला माता व बालक दोघांची प्रकृती अगदी सामान्य होती. प्राथमिक अंदाजानुसार, रात्रीच्या वेळी मातेने झोपलेल्या अवस्थेतच बालकाला स्तनपान (Breasfeeding) दिल्याने बालकाचा श्वास गुदमरला (Asphyxia) असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.” मात्र, नवजात बालकाच्या मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण शवविच्छेदन अहवाल (पोस्टमार्टम रिपोर्ट) आणि पोलिसांच्या पुढील तपासानंतरच अधिकृतपणे स्पष्ट होईल, असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले. तिरोडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.