स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन
तुमसर (प्रतिनिधी) : तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पावसाचे पाणी साचले असून परिसरात पसरलेली अस्वच्छता आणि वाढलेल्या झाडीझुडपांमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि रुग्णालयात स्वच्छता राखून रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याच्या मागणीसाठी स्वराज्य युवा एकता फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मिसुरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
पावसाच्या पाण्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात पाण्याचा योग्य निचरा होत नसून मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. तसेच आवारात वाढलेल्या घनदाट झाडीझुडपांमुळे डासोत्पत्ती वाढली असून साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा वावर वाढला आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून रात्रीच्या वेळी सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक रुग्णालय प्रशासनाच्या या अनास्थेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मिसुरकर यांची भेट घेऊन परिसराची तात्काळ सफाई करावी, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि डास प्रतिबंधक फवारणी करून रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याची आग्रही मागणी केली. यावेळी निवेदन सादर करताना स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते हर्ष कठाने, रोशन ढोके, इशू मोघरे, राकेश धांडे, अजय कनोजे, गोविंद भोंडेकर, मुकेश उपरिकर यासह नागरिक उपस्थित होते. रुग्णालय प्रशासनाने या मागण्यांकडे तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन लक्ष दिले व परिसरात साफसफाई करण्यासाठी सुरुवात केली आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची ग्वाही दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बाळबुद्धे, रुग्णालय अधिक्षक अमित चौधरी उपस्थित होते.





