23.4 C
Gondiā
Wednesday, September 2, 2026
Home विदर्भ सात दिवसांत दुसऱ्यांदा ‘आप’चा सर्जिकल स्ट्राइक; चंद्रपुरात कमी वजनाच्या गॅस सिलेंडरचा काळाबाजार...

सात दिवसांत दुसऱ्यांदा ‘आप’चा सर्जिकल स्ट्राइक; चंद्रपुरात कमी वजनाच्या गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघडकीस!

0
15

चंद्रपूर-सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या गॅस माफियांचा आम आदमी पक्षाने पर्दाफाश केला आहे. घरगुती गॅस सिलेंडरमधून चोरी केली जात असल्याच्या तक्रारींनंतर, अवघ्या सात दिवसांत दुसऱ्यांदा धाड टाकून ‘आप’ने चंद्रपुरातील अवैध रिफिलिंगचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज, २ सप्टेंबर २०२६ रोजी आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वृंदावन नगर येथील एका गोदामावर अचानक धाड मारली. सात दिवसांपूर्वीच कोसारा येथील गोदामावर कारवाई झाली असताना, आजच्या धाडीमुळे गॅस माफियांचे धाबे दणाणले आहेत.घटनेचे गांभीर्य ओळखून पुरवठा निरीक्षण अधिकारी, तहसील अधिकारी आणि दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आले.

तपासणीदरम्यान गोपिका गॅस एजन्सीच्या या गोदामात ६० हून अधिक घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर आढळले.२ किलो गॅसची चोरी: प्रत्येक सिलेंडरमधून तब्बल २ किलो गॅस काढून कमी वजनाचे सिलेंडर ग्राहकांना पुरवले जात होते.परराज्यातील मजुरांचा वापर: राजस्थानी मजुरांच्या मदतीने बेकायदेशीर रिफिलिंगचे हे रॅकेट चालवले जात होते.साहित्य जप्त: घटनास्थळावरून रोख रक्कम, आक्षेपार्ह कागदपत्रे आणि रिफिलिंगसाठी लागणारे साहित्य जप्त करून पोलिसांनी रीतसर पंचनामा केला आहे.

शहरातील इतर एजन्सी संशयाच्या भोवऱ्यात-धाडीदरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. शहरातील इतरही अनेक गॅस एजन्सींमध्ये अशाच प्रकारे वजनात मारून ग्राहकांची फसवणूक सुरू असल्याचे त्याने कबूल केले. त्यामुळे हे केवळ एका गोदामापुरते मर्यादित नसून संपूर्ण शहरात पसरलेले नेटवर्क असल्याचे स्पष्ट होत आहे.कारवाईप्रसंगी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, राजू कुडे, योगेश गोखरे, संतोष बोपचे आणि विशाल बिरमवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

“ही केवळ जनतेची आर्थिक फसवणूक नसून सुरक्षेशी खेळ आहे. अनधिकृत रिफिलिंगमुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? प्रशासनाने या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी आणि शहरातील सर्व गॅस एजन्सींची तात्काळ सखोल चौकशी करावी.”— आम आदमी पक्ष, चंद्रपूर