26.3 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home विदर्भ शिक्षण, कौशल्य विकासातून समाजाच्या प्रगतीला चालना देण्याचे आवाहन

शिक्षण, कौशल्य विकासातून समाजाच्या प्रगतीला चालना देण्याचे आवाहन

0
40

भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा

गोंदिया, दि.4 : सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या वतीने पंचायत समिती सभागृह, गोंदिया येथे 31 ऑगस्ट रोजी भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या सविता पुराम होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रूपेशकुमार राऊत व सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रणिता कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी केले.

शिक्षणासोबत कौशल्य विकास व पुनर्कौशल्य विकासावर भर देऊन भटके-विमुक्त समाजाच्या प्रगतीला चालना देणे आवश्यक आहे, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षण तसेच उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सविता पुराम यांनी भटके-विमुक्त समाजाच्या स्थिर निवास, शिक्षण, आरोग्य, रोजगार व आवश्यक कागदपत्रांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी शासन व समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.यावेळी निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चित्र व भिंतीचित्रक प्रदर्शनी, व्याख्यान, वैद्यकीय तपासणी शिबीर तसेच गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रोहिणी गोपे, बैजेस्वरी मेश्राम, निलेश मेश्राम, अर्मन कोल्हे, सुमित नागपुरे, भावेश बावणे, तनुश्री मानकर, वेद दानवे तसेच एम.टेक. पदवी प्राप्त नेहा राठोड यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास भटके-विमुक्त समाजातील पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंकुश अतकरे, देवदास बनकर, महेश चौधरी, आत्माराम खंडाते, भोलेश्वर वाढई, आयुष पुस्तोडे, रजत कुंभरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. दिशा गेडाम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नितीन साळुंखे यांनी मानले.