अर्जुनी-मोर. – ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकाची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात गोंदिया जिल्हा परिषदेला 445 शिक्षक उपलब्ध झाले आहेत. सबंधित शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी व समूपदेशनाची प्रक्रिया पूर्ण करून त्यांची रिक्त पदावर नियुक्ती केली जाणार आहे. जिल्ह्यातील शिक्षकांची मोठी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये यासाठी नियुक्ती प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यात 78 शिक्षकांची कमतरता आहे.हा अनुशेष पुर्ण भरुन शैक्षणिक कार्य गतीमान करण्याची मागणी अर्जुनी-मोर. पंचायत समिती उपसभापती संदीप कापगते यांनी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 2022 नंतर तब्बल 450 हून अधिक उच्चशिक्षित शिक्षकांची निवड करण्यात आल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल सर्वप्रथम अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे आभार व्यक्त केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकाची कमतरता ही अनेक वर्षापासून ची समस्या होती शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती आता 450 हून अधिक शिक्षक जिल्ह्याला मिळाल्याने शिक्षणाचा दर्जा नक्कीच उंचावेल अशी आशा संदीप कापगते यांनी व्यक्त केली.अर्जुनी-मोर. तालुका हा शैक्षणिक कार्यात जिल्ह्यात आघाडीवर आहे.तालुक्यात जि.प.प्राथमिक शाळा 129 असुन जि.प.हायस्कूल 3 असे एकुण 132 शाळा आहेत.तालुक्यात सहाय्यक शिक्षकांची 73 तर पदवीधर व विषय शिक्षकांची 5 असे एकुण 78 शिक्षकांची पदे रिक्त आहेत.त्यामुळे अर्जुनी-मोर.तालुक्यातील शिक्षकांचा हा अनुशेष या नविन भर्ती प्रक्रियेमुळे पुर्ण करण्यात यावा.असी मागणी अर्जुनी-मोर. पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते यांनी केली आहे.





