27.8 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home शैक्षणिक ‘From Launch to Leadership’ मधून फार्मसी विद्यार्थ्यांना करिअर व नेतृत्वाचे धडे

‘From Launch to Leadership’ मधून फार्मसी विद्यार्थ्यांना करिअर व नेतृत्वाचे धडे

0
7

चित्रा कापसे | तिरोडा: प्रगत विद्या फाउंडेशन संचालित ‘इम्पेरिअल कॉलेज ऑफ फार्मसी’, तिरोडा येथे फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘From Launch to Leadership’ या विषयावर प्रेरणादायी अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, उत्पादन लॉन्चिंग, विपणन (मार्केटिंग), व्यावसायिक कौशल्ये आणि करिअरच्या विविध संधींची माहिती मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

फार्मा क्षेत्रातील नेतृत्वाचा प्रवास या कार्यक्रमाला ‘हेगडे अँड हेगडे फार्मास्युटिकल’, मुंबईचे प्रॉडक्ट मॅनेजर पवन चौधरी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी फार्मास्युटिकल उत्पादनाच्या लॉन्चिंगपासून ते बाजारपेठेतील यश आणि नेतृत्वापर्यंतचा प्रवास विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितला. या वेळी त्यांनी प्रॉडक्ट नॉलेज, प्रभावी संवादकौशल्य, टीमवर्क, निर्णयक्षमता, व्यावसायिक नैतिकता, आत्मविश्वास आणि सतत शिकण्याची वृत्ती यांचे महत्त्व अधोरेखित केले.

उद्योग-शैक्षणिक संवादाची गरज कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी प्रगत विद्या फाउंडेशनचे सचिव अनूप बोपचे यांनी सांगितले की, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अशा व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित होतात.

कॉलेजचे प्राचार्य प्रलय बरहेवार यांनी वक्त्यांचे आभार मानताना म्हटले, “विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल उद्योगासाठी सक्षम बनवण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील असा थेट संवाद अत्यंत आवश्यक आहे.”या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना प्रॉडक्ट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगमधील करिअरच्या संधींची सविस्तर माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनीही या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. फार्मसी विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक विकासाला चालना देणारा आणि उद्योग-शैक्षणिक क्षेत्रातील नाते मजबूत करणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.