तिरोडा येथे शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात सत्कार
तिरोडा : शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देत नाही, तर त्यांच्या विचारक्षमतेला आणि व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडून भविष्याला आकार देण्याचे पवित्र कार्य करतो. सक्षम, सुजाण आणि जबाबदार नागरिक घडवून समृद्ध राष्ट्राची पायाभरणी करणाऱ्या शिक्षकांची भूमिका राष्ट्रनिर्मितीत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन खासदार राजेंद्र जैन यांनी केले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त (शिक्षक दिन) तिरोडा येथे तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांच्यावतीने आयोजित सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून खा. राजेंद्र जैन बोलत होते.
कार्यक्रमाला खासदार राजेंद्र जैन, आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, आमदार अविनाश ब्राह्मणकर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. उपस्थितांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.आपल्या मनोगतात खा. जैन पुढे म्हणाले की, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकांचा त्याग आणि समर्पणाचा गौरव करण्याचा दिवस आहे. योग्य मार्गदर्शनातूनच सशक्त समाज आणि समृद्ध राष्ट्र साकार होत असते, त्यामुळे शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण आहे.
या सोहळ्याला माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी आमदार भजनदास वैद्य, प्रेमकुमार रहांगडाले, सीताताई रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, अशोक असाटी, राजेश गुनेरिया, अविनाश जायस्वाल, दुर्गाप्रसाद ठाकरे, अश्विनी पटले, रवी पटले, शंकरलाल टेंभरे, तुमेश्वरी बघेले, ममता बैस, छाया कटरे, कुमुद मेश्राम, कादर अन्सारी, लता पुडके, रश्मी बुराडे, राखी गुनेरिया, माया बरयेकर यांच्यासह परिसरातील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





