26.3 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home Top News तलावात मासोळ्या पकडताना पाय घसरला; निलज येथील ८ वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी...

तलावात मासोळ्या पकडताना पाय घसरला; निलज येथील ८ वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

0
11

कान्हाबोळी तलावातील हृदयद्रावक घटना; संपूर्ण गावावर पसरली शोककळा

अर्जुनी-मोर : मासोळ्या पकडण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या एका अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकल्याचा तलावातील पाण्यात बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक व हृदयद्रावक घटना अर्जुनी-मोर तालुक्यातील निलज येथे शनिवारी घडली. जयेश भुमेश्वर चौधरी (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण निलज परिसरात सुतकी शांतता पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयेश हा तिसऱ्या वर्गात शिकत होता. शनिवारी तो नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत घराबाहेर खेळण्यासाठी आणि मासोळ्या पकडण्याचा आनंद घेण्यासाठी गेला होता. खेळता खेळता सर्व मुले घराशेजारीच असलेल्या कान्हाबोळी तलावाच्या परिसरात पोहोचली. तलावाच्या काठावर मासोळ्या पकडत असताना अचानक जयेशचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. तलावात पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्याची खोली जास्त असल्याने जयेश पाण्यात बुडू लागला.

मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत जयेशची प्राणज्योत मालवली होती. ऐन खेळण्या-बागडण्याच्या वयात काळाने घाला घातल्याने चौधरी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या क्रंदनाने उपस्थितांचे डोळे पाणावले.

घटनेची माहिती मिळताच अर्जुनी-मोर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. चिमुकल्या जयेशच्या अशा अचानक जाण्याने निलज गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.