गडचिरोली, ३ सप्टेंबर:गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. आज, ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४:३६ वाजता ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
राखीव वनक्षेत्रात भूकंपाचा केंद्रबिंदू
भूकंपशास्त्र केंद्रानुसार, या भूकंपाची खोली जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर होती. याचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. सिरोंचासोबतच अहेरी तालुक्यातील अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही नागरिकांना या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.घटनेची माहिती मिळताच स्थानिक तहसील व जिल्हा प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी सुरू केली. अहेरी तहसील प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण परिसरात परिस्थिती सामान्य असून कुठेही नुकसानीचे वृत्त नाही.
अफवांवर विश्वास ठेवू नका: जिल्हाधिकारी
“भूकंपाचे धक्के अत्यंत सौम्य स्वरूपाचे होते. प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता शांतता बाळगावी. भूकंपाबाबत कोणत्याही अफवांवर किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.





