पुणे, दि. ५: शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र असून शिक्षक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न देता त्यांच्यामध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी याच भूमीत शिक्षणाची ज्योत पेटवली. या समृद्ध शैक्षणिक परंपरेत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे खरे शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्याचे कार्य ते करतात.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले ही ग्रामीण महाराष्ट्राची खरी ताकद असून त्यांच्या गुणवत्ता आणि क्षमतेला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञांची भूमी आहे. राज्यातील अनेक शिक्षकांनी आपल्या कार्यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे, असेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, राज्य शासनाने शिक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासाला नेहमीच अग्रक्रम दिला आहे. बदलत्या काळानुरूप शिक्षकांनी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणासोबतच समस्या निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षणाची जोड देत त्यांच्यामध्ये सद्गुणांची रुजवणूक करावी. स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाणारी सशक्त पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.
विद्यार्थ्यांनी वाचन करावे, विचार करावा, प्रश्न विचारावेत, स्वतःचे मत तयार करावे आणि अपयशाची भीती बाळगू नये, असा सल्लाही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिला.
केंद्रप्रमुख हे शिक्षक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. केंद्रप्रमुखांच्या यशस्वी नेतृत्वामुळे अनेक शाळांनी प्रगती साधली आहे. शिक्षणामुळे सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो. स्व. अजितदादांनी नेहमीच महाराष्ट्राच्या तसेच पुणे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य दिले. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत अद्ययावत संगणक कक्ष, ई-लर्निंग सुविधा आणि डिजिटल वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना आधुनिक अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडविण्याचा शासनाचा निर्धार असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञानवारी, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सायन्स सेंटर, समूह शाळा, आदर्श शाळा, दत्तक शाळा, प्रवेशोत्सव, आरोग्य तपासणी, सैनिकी शिक्षण, मोफत गणवेश, निपुण महाराष्ट्र अभियान यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षकांचे प्रश्न, शाळांमधील सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शासन सदैव तत्पर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे म्हणाले, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी, ही जिल्हा परिषदेची भूमिका आहे. शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. चांगल्या कामाचे नेहमीच मूल्यमापन केले जाईल. शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न राज्य शासनाने मार्गी लावल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४३६ शिक्षक नव्याने रुजू होणार आहेत. शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा ताण कमी करण्याबाबतही राज्य शासन लवकरच निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसोबतच सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील बिबट्या प्रवण क्षेत्रातील शाळांना संरक्षक भिंती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रास्ताविकात जिल्हा परिषद शाळांच्या प्रगतीचा आढावा घेतला. राज्य गुणवत्ता यादीतील ५० टक्के विद्यार्थी पुणे जिल्हा परिषदेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या मिशन ३००, ग्लोबल गुरुजी, शिक्षक सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण, बालकुमार साहित्य संमेलन, मुलींसाठी सायकल बँक, बालसंसद आदी उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी ५३ शिक्षक, ५२२ गुणवंत विद्यार्थी तसेच अध्यक्ष चषक स्पर्धेतील तीन विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हा परिषद सभापती जितेंद्र बडेकर, अमोल नलावडे, अंकिता पाटील, दीपाली हुलावळे, शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, डॉ. भाऊसाहेब कारेकर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




