26.3 C
Gondiā
Saturday, September 5, 2026
Home महाराष्ट्र ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या डीजे-डॉल्बीवर पूर्णत: बंदीची मागणी योग्यच !

ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या डीजे-डॉल्बीवर पूर्णत: बंदीची मागणी योग्यच !

0
24
‘आरपीआय’चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांची भूमिका 
 पुणे:-सार्वजनिक उत्सवांमध्ये वाजवल्या जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टिममुळे नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत गंभीर आणि जीवघेणे दुष्परिणाम होतात. हे धोके लक्षात घेता राज्यभरातील सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे-डॉल्बीच्या वापरावर कायमस्वरूपी कडक बंदी घालण्याच्या मागणीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी समर्थन केले आहे.

डीजे सिस्टिम सुरू होताच ध्वनीची तीव्रता १०० ते १३० डेसिबेलच्या वर जाते, जी कायदेशीर मर्यादा ५५ ते ७५ डेसिबेलपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार सलग काही वर्षे उत्सव काळात शहरातील ९० टक्क्यांहून अधिक भाग उच्च ध्वनि प्रदूषणाच्या विळख्यात सापडतात. या तीव्र आवाजाच्या कंपनांमुळे आणि लेझर लाईट्समुळे दरवर्षी नागरिक आणि बालकांना कायमचे बहिरेपण, दृष्टीदोष व मानसिक अपंगत्व येते; ही बाब गंभीर असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

डीजेच्या अत्यंत उच्च आवाजामुळे कार्डियाक अरेस्ट येऊन नागरिकांचे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत. सांगली येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत ३२ वर्षीय शेखर पावशे व ३५ वर्षीय प्रवीण शिरतोडे या युवकांचा डीजेच्या तीव्र आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच तीव्र आवाजामुळे कानाचे पडदे फाटणे, उच्च रक्तदाबाने गंभीर आजारी पडणे अशा शेकडो वैद्यकीय आपत्कालीन घटना दरवर्षी नोंदवल्या जातात, असे डॉ.चलवादी यांनी नमूद केले.

डीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवणे हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. सार्वजनिक उत्सवांचा उद्देश समाजात एकोपा, सांस्कृतिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी वाढवणे हा आहे. त्यामुळे उत्सव मंडळांनी डीजे-डॉल्बीला प्राधान्य न देता आपल्या समृद्ध परंपरेचा वारसा जपणाऱ्या ढोल-ताशांसह लेझीम, हलगी, तुतारी आणि इतर पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सवाचा सांस्कृतिक बाज अधिक प्रभावीपणे जपला जाऊ शकतो आणि पुढील पिढीलाही आपल्या लोकपरंपरांची ओळख करून देता येईल. आधुनिकतेच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण वाढवण्यापेक्षा संस्कृती, परंपरा आणि सामाजिक सलोखा जपणारा उत्सव साजरा करणे हीच काळाची गरज असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.
….