30.3 C
Gondiā
Thursday, September 10, 2026
Home शैक्षणिक  शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची जिल्ह्यातील विविध शाळांना भेट

 शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची जिल्ह्यातील विविध शाळांना भेट

0
94

विद्यार्थ्यांशी साधला संवाद; शैक्षणिक सुविधांचा घेतला आढावा

गोंदिया, दि.10 : शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान विविध शाळांना भेट देऊन शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती तसेच शाळांमधील उपलब्ध भौतिक व शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य तसेच गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषय सहायक व केंद्रप्रमुख उपस्थित होते.दौऱ्यादरम्यान शिक्षण आयुक्त श्री. सिंह यांनी सडक-अर्जुनी तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डव्वा, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सडक-अर्जुनी तसेच अंगणवाडी व बालवाटिका सडक-अर्जुनी येथे भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणाबाबतच्या अपेक्षा, भविष्यातील स्वप्ने व करिअरविषयक आकांक्षा जाणून घेतल्या. त्यांनी वर्गभेटीदरम्यान अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहभाग तसेच विज्ञान व गणित विषयाच्या अध्ययनाची माहिती घेतली.तसेच पीएम पोषण आहार योजना, पीएम श्री शाळा अनुदान, शाळांमधील भौतिक सुविधा, अध्ययन व अध्यापन साहित्य, परसबाग, परिसर स्वच्छता, व्यवसाय शिक्षण, कार्यशिक्षण, वाचनालय व संगणक कक्ष आदींची पाहणी करून संबंधितांकडून माहिती जाणून घेतली.

अंगणवाडी व बालवाटिकेतील शैक्षणिक वातावरण आणि बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचाही त्यांनी आढावा घेतला. शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना येणाऱ्या अडचणी, शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न तसेच शाळाबाह्य कामांबाबतची माहितीही त्यांनी जाणून घेतली.शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, आनंददायी व विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी उपलब्ध सुविधा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने या भेटीदरम्यान त्यांनी विविध बाबींचा आढावा घेतला.