30.7 C
Gondiā
Wednesday, September 9, 2026
Home शैक्षणिक भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे संघ करणार नागपूर विभागात गोंदिया...

भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे संघ करणार नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

0
5

जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

गोंदिया, दि. 9 सप्टेंबर : केंद्र शासनाच्या लोकसंख्या शिक्षण उपक्रमांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे मार्गदर्शन व निर्देशान्वये जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा आज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), गोंदिया येथील सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेले संघ या दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.

स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करत भूमिका अभिनय व लोकनृत्य या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकाविणारे संघ नागपूर विभागस्तरावर गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत, अशी माहिती डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी दिली.

स्पर्धेचे आयोजन प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता तथा लोकसंख्या शिक्षण विभागप्रमुख डॉ. नरेश वैद्य होते. प्रमुख उपस्थितींमध्ये विषय सहाय्यक सुनील हरिणखेडे, संदीप सोमवंशी, सहविभागप्रमुख तथा साधन व्यक्ती उर्मिला वैद्य व श्रीमती अनिता ठेंगडी यांचा समावेश होता.स्पर्धेचे परीक्षण अध्यापक विद्यालय, गोंदिया येथील अध्यापकाचार्य श्रीमती श्रद्धा निनावे व श्रीमती टीना ठाकरे यांनी केले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट व प्रभावी सूत्रसंचालन विषय साधन व्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विशेष शिक्षक प्रमोद खोब्रागडे यांनी केले.

🏆 भूमिका अभिनय स्पर्धेतील विजेते-🥇 प्रथम क्रमांक :जिल्हा परिषद हायस्कूल, करटी बुद्रुक, ता. तिरोडा

🥈 द्वितीय क्रमांक :पी. एम. श्री शहीद जाण्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल, गोरेगाव, ता. गोरेगाव

🥉 तृतीय क्रमांक :जिल्हा परिषद हायस्कूल, सौंदड, ता. सडक अर्जुनी

🏆 लोकनृत्य स्पर्धेतील विजेते-🥇 प्रथम क्रमांक :अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, नंगपुरा/मुर्री, ता. गोंदिया

🥈 द्वितीय क्रमांक :अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, डव्वा, ता. सडक अर्जुनी

🥉 तृतीय क्रमांक :अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, सरांडी, ता. तिरोडा

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी भूमिका अभिनयातून विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांवर प्रभावी भाष्य केले, तर लोकनृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.विजेत्या सर्व संघांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले असून, नागपूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन्ही प्रथम क्रमांकाच्या संघांना शुभेच्छा देण्यात आल्या.