वाशिम, दि. ११ सप्टेंबर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, वाशिम यांच्या कार्यालयाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे आपसी सहमतीने अथवा तडजोडीने निकाली काढण्यासाठी महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या महसूल लोक अदालतीचे आयोजन २३ सप्टेंबर २०२६, ९ डिसेंबर २०२६ आणि १६ फेब्रुवारी २०२७ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत करण्यात येणार आहे. महसूल लोक अदालतीचे ठिकाण जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, वाशिम यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला माळा, खोली क्र. १०४, काटा रोड, वाशिम असे आहे.
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांतील अर्जदार, जाबदार तसेच इतर संबंधित पक्षकारांना त्यांची प्रकरणे आपसी सहमतीने अथवा तडजोडीने निकाली काढण्याची इच्छा असल्यास, संबंधित लोक अदालत दिनांकापूर्वी आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयाशी संपर्क साधता येईल.
कार्यालयाकडून स्वतंत्रपणे नोटीस अथवा सूचना प्राप्त झालेल्या पक्षकारांनी संबंधित लोक अदालत दिनांकास आवश्यक मूळ कागदपत्रे, ओळखपत्र आणि प्रकरणाशी संबंधित अभिलेखांसह नियोजित वेळेत उपस्थित राहावे. दोन्ही पक्षांनी तडजोडीस सहमती दर्शविल्यास शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
पक्षकार अनुपस्थित राहिल्यास संबंधित प्रकरणाबाबत महसूल लोक अदालत अभियानांतर्गत तडजोडीची कार्यवाही करणे शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी नियोजित दिनांक व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिल्पा सानप यांनी केले आहे.





