भंडारा: भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी साकोली तालुक्याच्या पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि ट्रॅक्स गाडीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात (Bhandara Accident News) 8 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अपघातातील सर्व मृतक हे छत्तीसगड राज्यातील मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्तीसगडमधील काही मजूर ट्रॅक्स गाडीने नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते. पिंपळगाव येथील एका पेट्रोल पंपावरून एक आयशर ट्रक रस्त्यावर निघत असताना, मागून येणाऱ्या ट्रॅक्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव ट्रॅक्स थेट आयशर ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्स गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या दुर्दैवी अपघातात ट्रॅक्समधील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नॅशनल हायवे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातातील गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हे सर्व छत्तीसगडचे मजूर आहेत, ते”नागपूर” च्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला.पेट्रोल पंपावरून निघणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून आलेल्या मजुरांच्या ट्रॅक्सने धडक दिल्याने ही घटना घडली आहे, तर प्राथमिक माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची नॅशनल हायवे पोलिसांनी माहिती दिली आहे. उर्वरित गंभीर जखमींना”भंडारा” मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
महामार्गावरील या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.





