प्रोत्साहन रक्कम तात्काळ खात्यात जमा करण्याची डॉ. विवेक मेंढे यांची मागणी
गोरेगाव (प्रतिनिधी):गोरेगाव तालुक्यासह संपूर्ण परिसरात सध्या शेतकरी विविध नैसर्गिक व किडीच्या संकटांनी पुरता हवालदिल झाला आहे. एकाबाजूला सततच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, दुसऱ्या बाजूला खोडकिडा, मावा व तुडतुड्यासारख्या घातक कीटकांच्या प्रादुर्भावाने उरले-सुरले पीकही हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अद्याप शासनाकडून मिळणारा बोनस आणि प्रोत्साहन रक्कम न मिळाल्याने बळीराजा तीव्र नाराजी व्यक्त करत आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांना हेक्टरी प्रोत्साहन रक्कम देण्याबाबत मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. निवडणुकीपूर्वी हेक्टरी २५ हजार रुपये प्रोत्साहन रकमेची चर्चा होती, तर त्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी २० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा होऊनही अनेक महिने उलटले तरी ही रक्कम अद्याप पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. तसेच शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच्या प्रलंबित बोनस व प्रोत्साहन रकमेबाबत स्पष्ट निर्णय घेऊन ती तातडीने वितरित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. विवेक मेंढे यांनी प्रशासनाला त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख मागण्या:
-
गोरेगाव तालुक्यातील बाधित शेतपिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने संयुक्त पंचनामे करण्यात यावेत.
-
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी.
-
प्रलंबित असलेली हेक्टरी प्रोत्साहन/बोनसची रक्कम तात्काळ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी.
सततच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत आहे. त्यातच कीटकांचा प्रादुर्भाव आणि शासकीय मदतीतील विलंबामुळे त्यांच्यापुढील अडचणी अधिक वाढल्या आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक शेतकऱ्यांकडून दिला जात आहे.





