# नवीन दारू दुकानांना तीव्र विरोध; किडंगीपार दारूबंदी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
आमगाव : आमगाव नगर परिषद क्षेत्रातील आठ गावांमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध दारूविक्रीला आळा घालावा तसेच नवीन दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी भारतीय जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा नगर परिषद प्रांगणातून सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे.
आमगाव नगर परिषद क्षेत्रातील आठ गावांमध्ये अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक वातावरणावर परिणाम होत असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. विशेषतः युवकांचे भविष्य, महिलांची सुरक्षितता आणि गावातील शांतता यांचा विचार करून प्रशासनाने अवैध दारूविक्रीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मोर्चाच्या माध्यमातून आठही गावांमधील अवैध दारूविक्रीचे अड्डे तातडीने उद्ध्वस्त करावेत, नवीन दारू दुकानांना परवानगी देऊ नये आणि गावातील शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवावी, या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत.याशिवाय किडंगीपार येथील दारूबंदी आंदोलनातील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
‘अवैध दारूविक्री बंद झालीच पाहिजे, नवीन दारू दुकानांना आमचा तीव्र विरोध’ असा निर्धार व्यक्त करत नागरिकांनी या शांततामय मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.“एकच आवाज, एकच ध्यास… व्यसनमुक्त आमगावचा आमचा संकल्प!” या घोषवाक्यासह माता-भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.





