24.3 C
Gondiā
Sunday, September 13, 2026
Home गुन्हेवार्ता शेताच्या कुंपणात अडकून १६ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू; घातपाताची शक्यता

शेताच्या कुंपणात अडकून १६ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू; घातपाताची शक्यता

0
16

गोंदिया: आमगाव तालुका परिसरात शेताच्या कुंपणात अडकून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१३ सप्टेंबर) उघडकीस आली. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला, याचा शोध वनविभागाने सुरू केला आहे.

या घटनेत घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आकरे यांनी स्पष्ट केले आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे त्यांनी सांगितले.

वनविभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत बिबट्याचे वय सुमारे १६ महिने आहे. शेतात लावलेल्या कुंपणात अडकल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरी यात कोणताही मानवी हस्तक्षेप किंवा घातपात आहे का, यादृष्टीनेही तपास केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत बिबट्याचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करण्यात येणार असून, त्याचा अहवाल आणि पुढील तपासानंतरच मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होईल.

दरम्यान, शेताभोवती घातली जाणारी कुंपणे आता वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहेत. जंगलालगतच्या भागात प्राण्यांच्या वावरादरम्यान अशी कुंपणे त्यांच्यासाठी जीवघेणी ठरू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेताला कुंपण घालताना वन्यजीवांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.