29.8 C
Gondiā
Tuesday, September 15, 2026
Home विदर्भ वृक्षधरा फाउंडेशन आणि अपना गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ५१ मोठ्या वृक्षांचे भव्य...

वृक्षधरा फाउंडेशन आणि अपना गणेश उत्सव मंडळाच्या वतीने ५१ मोठ्या वृक्षांचे भव्य वृक्षारोपण

0
5

विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश, वृक्ष संवर्धनाची घेतली शपथ

गोंदिया, दि. १५ सप्टेंबर– पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा मिळावी या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकी जपत वृक्षधरा फाउंडेशन आणि अपना गणेश उत्सव मंडळ, सिव्हिल लाईन, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज माँ शारदा इंटरनॅशनल स्कूल, नागराधाम येथे ५१ मोठ्या वृक्षांचे भव्य वृक्षारोपण उत्साहात संपन्न झाले.

यावर्षी अपना गणेश उत्सव मंडळाने केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे यावेळी लहान रोपे न लावता ५ ते ६ फूट उंचीची, जगण्याची क्षमता अधिक असलेली मोठी झाडे लावण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केवळ झाडे लावून फोटो काढणे पुरेसे नाही, तर लावलेल्या झाडाचे संगोपन करून त्याला मोठे करणे हीच खरी देशसेवा आणि काळाची गरज आहे. वाढते तापमान, कमी होत असलेले पर्जन्यमान आणि प्रदूषण या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना झाडांचे मानवी जीवनातील महत्त्व, ऑक्सिजन निर्मिती, पर्यावरण संरक्षणातील भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी हात उंचावून “आम्ही लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संवर्धन करू आणि पर्यावरणाचे रक्षण करू” अशी शपथ घेतली. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले, माँ शारदा इंटरनॅशनल स्कूलचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश लिल्हारे, पोलीस उपअधीक्षक दिनेश शुक्ला, गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वैभव पवार, पंचायत समिती सदस्या सौ. नंदिनी लिल्हारे उपस्थित होते. तसेच अपना गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अमित अवस्थी,अरविंद तिवारी,विवेक रहांगडाले, राकेश लाँजेवार,मोहन लिल्हारे,ऋतुराज मिश्रा,अश्विन ठाकुर,पलाश लालवानी यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि वृक्षधरा फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. शेवटी लावलेल्या ५१ वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी शाळेने स्वीकारली असून त्यासाठी नियमित पाणी आणि देखभाल केली जाणार आहे.