29.8 C
Gondiā
Tuesday, September 15, 2026
Home विदर्भ गोंदिया जि.प.इमारत सुरक्षेत त्रुटी: कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात तोडफोड,संगणक चोरीला

गोंदिया जि.प.इमारत सुरक्षेत त्रुटी: कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात तोडफोड,संगणक चोरीला

0
170

; सर्व सीसीटीव्ही बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

गोंदिया,(खेमेंद्र कटरे) दि.१५:गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधून सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाल्याची एक गंभीर घटना आज १५ सप्टेंबरला समोर आली आहे. चोरट्यांनी थेट बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षाचे दरवाजाचे काच फोडून आत प्रवेश करत तोडफोड केली, संगणक चोरून नेला आणि थेट छताच्या पंख्यांचीही मोडतोड केली.तसेच अश्लिल भाषेत कार्यकारी अभियंत्यांना शिविगाळ करणारे कागदही चिकटवल्याचे समोर आले आहे.११ सप्टेंबरपासून सतत सुट्टी असल्याने आज नियमित कार्यालय सुरु होताच सदर प्रकरण उघडकीस आले.याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि जीविताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करुन लावलेले जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार सुध्दा उघडकीस आला आहे.

इतकी मोठी इमारत, पण सर्व सीसीटीव्ही बंद!

या घटनेत सर्वात धक्कादायक आणि संशयास्पद बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या संपूर्ण इमारतीमध्ये बसवण्यात आलेले सर्वच्या सर्व सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बंद अवस्थेत आढळले आहेत. एवढ्या मोठ्या शासकीय इमारतीत आणि संवेदनशील विभागात एकही कॅमेरा कार्यरत नसणे ही निव्वळ योगायोग आहे की एखादा मोठा कट, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्ही बंद असणे ही एक ‘वेगळीच कहाणी’ बयां करत असून यामुळे प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कार्यकारी अभियंत्यांच्या जीवाला धोका?

ज्या पद्धतीने थेट कार्यकारी अभियंत्यांच्या दालनाला लक्ष्य करून दाराचे काच फोडण्यात आले आणि संगणकाची चोरी करण्यात आली, त्यावरून ही केवळ साधी चोरी नसून महत्त्वाचे प्रशासकीय दस्तावेज व पुरावे नष्ट करण्याचा किंवा संबंधित अधिकाऱ्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी दाट शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जीवालाच धोका निर्माण झाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगू लागली आहे.

शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा

जिल्हा परिषदेसारख्या मुख्यालयात रात्रंदिवस सुरक्षा व्यवस्था असणे अपेक्षित असताना चोरट्यांनी बिनधास्तपणे आत घुसून:

  • कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षाचे दरवाजाचे काच फोडले.

  • शासकीय माहिती असलेला संगणक चोरून नेला.

  • कार्यालयातील पंख्यांची मोडतोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.

कडक कारवाईची मागणी

या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे अचानक कसे बंद पडले? यामागे कोणाचा हात आहे? आणि शासकीय कार्यालयातील महत्त्वाचा डाटा चोरीला जाण्यामागे नक्की कोणता हेतू होता? या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून आरोपींना तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.