25.1 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home महाराष्ट्र भगवान बुध्द आणि डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात मिळणार वैचारिक मेजवानी

भगवान बुध्द आणि डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात मिळणार वैचारिक मेजवानी

0
31

मुंबई, दि. 7 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती कार्यक्रमानिमित्त येत्या 10 मे रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे विश्व शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत विविध देशांचे भारतातील राजदूत,जागतिक किर्तीचे विचारवंत, बौध्द तत्वज्ञानी तसेच मोठ्या प्रमाणावर भंतेगण उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
तथागत भगवान गौतम बुध्द यांची 2579 वी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती एकत्रितरित्या साजरी करण्यात येणार आहे. या संयुक्त जयंती दिन कार्यक्रमात चीन, जापान, म्यानमार, श्रीलंका व थायलंड देशांचे भारतातील राजदूत सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विश्वशांती परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विश्वशांती परिषदेत विविध वैचारिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात असून परिषदेच्या सुरुवातीस काळाघोडा ते गेट वे ऑफ इंडिया अशी भव्य शांतता रॅली काढण्यात येणार असल्याचेही श्री. बडोले यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर समतेसाठी संघर्ष केला तर तथागतांनीविश्वाला शांतीचा संदेश दिला, या दोनही महामानवांच्या तत्वांना अनुसरून शासनाने विश्व शांती परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत विश्वातील मानवाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तसेच शांतीचा संदेश यावर वैचारिक मंथन होणार आहे. संयुक्त जयंती कार्यक्रमाची सुरूवात सायंकाळी साडेपाच वाजता काळाघोडा येथून निघणाऱ्या भव्य रॅलीने होणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी गेट वे ऑफ इंडिया येथे रॅली पोहचल्यानंतर साडेसहा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने बौध्द भिख्खू, विचारवंत, बौध्द राष्ट्रांचे भारतातील राजदूत वैचारिक मांडणी करणार आहेत.
बौध्द राष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या जयंतीप्रमाणे महाराष्ट्रातील जयंती शिस्तीत आणि उत्साहात साजरी होणार आहे. एक आगळावेगळा कार्यक्रम साजरा करण्याची परंपरा यानिमित्ताने महाराष्ट्रापासून सुरू होणार आहे. त्यामुळे 10 मे रोजी सायंकाळी होणाऱ्या शांतता रॅलीत सहभागी होतांना सहकुटूंब श्वेत वस्त्र परिधान करून शिस्तीत रांगेने सहभागी व्हावे. कुठेही घोषणाबाजी, आरडाओरडा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन श्री. बडोले यांनी केले आहे.