नांदेड,,दि.09:: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी, शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यांचे वृध्दपकाळाने वयाच्या 89 व्या वर्षी सोमवार (दि. 8)ला दुपारी 1.30 वाजता वसंतनगर येथील ससाईसुभाष निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यावर आज मंगळवार दि. 9 मे रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या चिखली ता. कंधार या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात्य शिवसेनेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व श्याम पाटील ही दोन मुल, आशाताई श्यामसुंदर शिंदे हाळदेकर ही मुलगी, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.
गांधीवादी विचारश्रेणीचे कै. गोविंदराव पाटील चिखलीकर यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1929 साली कंधार तालुक्यातील चिखली या छोट्याशा गावात झाला.चिखली येथील श्रीमंत शेतकरी मारोती पाटील यांंचा एकुलता एक मुलगा गोविंदराव पाटील हे होते. आंचोली येथील आनंदराव पाटील मोरे यांची मुलगी वच्छलाबाई यांच्याशी झाला. गोविंदराव पाटील यांचे इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण मांजरम येथे झाले. त्यानंतर ते नांदेड येथील प्रतिभा निकेतन या शाळेत 9 व्या वर्गात प्रवेश घेवून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.विवाहबध्द झाल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी 1960 मध्ये नांदेडला राहण्यासाठी आले आणि येथेच स्थायीक झाले. गांधीवादी विचारश्रेणीचा पगडा त्यांच्या मनावर विद्यार्थी असतानाच झाला होता. तरुणांचा एक संघ तयार करुन त्यांनी हैद्रबाद मुक्तीसंग्रामच्या लढ्यात उडी घेतली. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्राफ असे दिग्गज नेत्यांचा सहवास त्यांना लाभला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. शंकरराव चव्हाण यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्या सहवासात गोविंदराव पाटील हे राजकारणात सक्रीय झाले. कै. कुसूमताई चव्हाण ह्या गोविंदराव पाटील यांना भाऊ मानले होते. बहिण-भावाचे नाते त्यांनी शेवटपर्यंत जोपासले. भाऊ म्हणून गोविंदराव पाटील यांनी कुसुमताई यांना एक गाय आदंन दिली होती. या बहिण-भावाच्या नात्यातून चव्हाण-चिखलीकर घराण्याचे ऋणानुबंध जुळले.
सक्रिय राजकारणात आल्यानंतर त्यांनी 1962 साली उस्माननगर जि.प.सर्कलमधून पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर त्यांनी सन 1967 साली कापसी जि.प.सर्कलमधून दुसर्यांदा विजयी झाले. सलग दहा वर्षे जि.प.सदस्य म्हणून काम केले. सन 1978 ते1987 या काळात कलंबर सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. शंकरराव चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून मसकात सहभागी झाले. नांदेड जिल्हा महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस पक्षाचे (मसका) उपाध्यक्ष म्हणून पक्ष संघटना बांधणीचे काम केले. सन 1989-2000 या काळात भू-विकास बँकेचे चेअरमन म्हणून शेतकर्यांची सेवा केली. वसंतनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे उपाध्यक्ष असताना वसंतनगर येथे वस्तीवाढ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. राजकारणात सत्तेची विविध पदे भूषवित असताना त्यांच्या स्वच्छ चारित्र्यावर एकही डाग लागला नाही. निष्कलंक व्यक्तीमत्व असलेले गोविंदराव पाटील अतिशय शांत स्वभावाचे त्यामुळेच त्यांना लोकांनी शांतीदूत ही उपाधी बहाल केली. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर यानावाने ते सुपरिचित झाले. कै. शंकरराव चव्हाण यांची साथ त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सोडली नाही. कालांतराने राजकारणात अशोकराव चव्हाण व प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात संघर्ष सुरु झाला. त्यावेळी त्यांच्या मनाला असाहय वेदना होत होत्या. चिखली येथील एका मुलाखतीत त्यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखविताना म्हणाले होते, अशोकराव व प्रतापराव यांच्यातील भांडण मिटलं पाहिजे. दोघांनीही एक पाऊल मागे घेवून एकत्र यायला हवे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
गोविंदराव पाटील चिखलीकर यांना चार मुले होती. मोठा मुलगा सुभाष पाटील, दुसरा मुलगा बालाजी पाटील, तिसरा मुलगा प्रतापराव पाटील चिखलीकर तर चौथा श्याम पाटील अशी चार मुलगे.थोरला मुलगा सुभाषराव पाटील यांंचे र्हदयविकाऱाच्या तीव्र झटक्याने दुदैवी निधन झाले. त्यावेळी गोविंदराव पाटील यांचे सांंत्वन करण्यासाठी अनेक मान्यवर चिखली येथे आले होते. केंद्रीय मंत्री असताना कै. शंकरराव चव्हाणसाहेबही चिखलीला आले होते. चव्हाण साहेबांनी गोविंदराव पाटील यांना मिठी मारली. चव्हाण साहेबांच्या डोळ्यातून सारखे आश्रू वाहत होते. वातावरण गंभीर झाले होते. कोणीच बोलत नव्हते. सर्व शांत होताच गोविंदराव पाटील चिखलीकर हळू बोलले, साहेब माझ्या आयुष्यात जे होणार होते ते झाले त्याला कोण काय करणार, या वाक्याने शंकरराव चव्हाण गोविंदराव पाटील यांच्या तोंडाकडे पाहत राहिले. चिखलीकर कुटूंबावर एवढा मोठा दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही शांतीदूत गोविंदराव पाटील हे धैर्याचे महामेरु किंचितही डळमळले नाहीत.
अभियंता असलेले बालाजी पाटील चिखलीकर यांचे अपघातील निधन मुंबई ठाणे येथे झाले. घरात मंगलकार्याचे वातावरण असताना मुलाच्या अपघाती निधनाची बातमी कळताच चिखलीकर कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अशा परिस्थितीतही गोविंदराव पाटील यांनी धैर्याने संकटाला तोंड दिले. बालपाणापासून ते आखेरपर्यंत गोविंदराव पाटील यांच्यावर अनेक दु:खाचे डोंगर कोसळले तरीही त्यांनी खचले नाहीत. मोठ्या नेटाने कुटूंबांना धीर देत चिखलीकर कुटूंबांचा वटवृक्ष फुलवित ठेवला होता. गेल्या दोन-तीन वर्षापासून गोविंदराव पाटील यांची तब्यात साथ देत नव्हती. मुलगा असला तरी प्रतापराव म्हणूनच हाक मारीत होते. सर्वसामान्य असो की मोठा व्यक्ती त्याला बोलताना जी असे शब्दप्रयोग करायचे. आयुष्यात त्यांना कोणत्याच गोष्टीचे व्यसन जडले नव्हते. सकाळी चार वाजता उठणे व्यायम करणे अशी त्यांची दिनचर्या होती. घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला चहा-पाणी घेतल्याशिवाय जावू द्यायचे नाही. जेवण केलं की नाही, जेवण करा असा आग्रह प्रत्येकाला करायचे, वारकरी संप्रदायाचे ते पाईक होते. प्रतापराव चिखलीकर हे नौकरी करावे असा गोविंदराव पाटील यांचा मानस होता. तशा प्रयत्नही त्यांनी पद्श्री श्यामराव कदम, संभाजी पाटील उमरेकर, भास्करराव पाटील खतगांवकर यांच्यामार्फत केला होता. प्रतापराव मात्र कोठेही नौकरीच्या ठिकाणी कायमस्वरुपी रमले नाहीत. त्यामुळे ते राजकारणात आले आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक मिळवत आहेत. सुभाषरावांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी प्रतापरावांवर येवून पडली. चिखली गावाकडे वास्तव्यास असताना गोविंदराव पाटील पहाटे चार वाजता उठल्यानंतर ते शेताकडे जावून फेरी मारुन येत होते. आयुष्यात त्यांनी चहा, सुपारीचे देखील सेवन केले नाही. घराबाहेर पडल्यानंतर बाहेरचे पाणी देखील ते पित नव्हते. अशा निष्कलंक, चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व असलेल्या शांतीदूत गोविंदराव पाटील यांचा अखेर सोमवारी अस्त झाला.





