24.8 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home महाराष्ट्र सावित्रीबाईंच्या विचारांची ज्योत पिढ्यान्‌पिढ्या तेवत राहील : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

सावित्रीबाईंच्या विचारांची ज्योत पिढ्यान्‌पिढ्या तेवत राहील : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

0
3
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्ञानशिल्पाचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे,दि.२१ः- सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची आणि परिवर्तनवादी विचारांची साक्ष देणाऱ्या २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण करण्याचे भाग्य लाभणे हा माझ्यासाठी मनस्वी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. या ज्ञानशिल्पांतून शिक्षण, मानवता, समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ज्ञानशिल्प लोकार्पण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. कपिल पवार, विद्यापीठाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, विविध व्यवस्थापन मंडळांचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यांनी केवळ एका पिढीला शिक्षण दिले नाही, तर पुढील अनेक पिढ्यांसाठी परिवर्तनाची वाट निर्माण केली.
सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचे विविध पैलू या ज्ञानशिल्पांतून मांडण्यात आले आहेत. पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू करणे, पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कार्य करणे, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, कवयित्री व साहित्यिक म्हणून योगदान, सत्यशोधक चळवळीत सहभाग आणि प्लेगच्या महामारीत रुग्णांची सेवा करणे, अशा अनेक कार्यांचा यात समावेश आहे. “या ज्ञानशिल्पांमध्ये आरसा लावून त्याखाली ‘मी कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्या आरशात पाहताना मलाही हा प्रश्न पडला. पुढच्या क्षणी जाणवले की मी सावित्रीची लेक आहे. एका छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या मुलीला आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, यामागे सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा आहे. त्याबद्दल मी सदैव ऋणी आहे,” असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या.
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काम करताना मोठा विरोध आणि त्रास सहन केला. मात्र, त्यांनी आपल्या ध्येयापासून कधीही माघार घेतली नाही. सावित्रीबाईंनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत आज देशभर प्रकाश देत असून, त्याच संघर्षाच्या बळावर महिला आज विज्ञान, शिक्षण, प्रशासन, उद्योग, क्रीडा, संरक्षण आणि शेतीसह प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत आहेत, असे पवार यांनी नमूद केले.blank
पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्यात फुले दाम्पत्याचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या कामासाठी अजितदादा पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. आवश्यक परवानग्या मिळवून हे काम पुढे नेण्यासाठी त्यांनी विशेष पाठपुरावा केला, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
महाराष्ट्राला जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा महान वारसा लाभला आहे. जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना संस्कार दिले, सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, तर अहिल्यादेवींनी लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श निर्माण केला. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी ही जिजाऊ, सावित्री आणि अहिल्येची लेक आहे, असे त्यांनी सांगितले.
महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून ‘लेक लाडकी’, ‘लाडकी बहीण’, ‘पिंक रिक्षा’, ‘लखपती दीदी’ यांसारख्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावा, ही महाराष्ट्राची भावना आहे. त्यांच्या महान कार्याचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी महाराष्ट्र विधानसभेने केंद्र सरकारकडे एकमताने शिफारस केली असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ज्ञानशिल्पांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा, शैक्षणिक कार्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा परिचय नव्या पिढीला होणार आहे. ज्ञानशिल्पांमधून सावित्रीबाईंच्या जीवनातील विविध पैलू साकारण्यात आले आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी सुरू केलेली पहिली शाळा, प्रौढ शिक्षणाचा आग्रह, सत्यशोधक चळवळीतील सहभाग, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी केलेले कार्य, समाजप्रबोधन, साहित्यिक योगदान, महात्मा फुले यांच्यासोबतचे सहजीवन आणि प्लेगच्या साथीच्या काळात केलेली लोकसेवा अशा अनेक प्रसंगांचे दर्शन या ज्ञानशिल्पांतून घडते. ही ज्ञानशिल्पे केवळ भिंतीवरील चित्रे नसून इतिहास आणि वर्तमानाचा संवाद घडविणारे माध्यम आहेत. विद्यापीठ परिसरात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या ज्ञानशिल्पांतून सावित्रीबाईंच्या विचारांची ओळख होईल आणि शिक्षणाचा उपयोग समाजाच्या परिवर्तनासाठी करण्याची प्रेरणा मिळेल.
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ज्ञानशिल्पांची निर्मिती हा केवळ कलात्मक उपक्रम नसून त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. या ज्ञानशिल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या संघर्षाची, सामाजिक बांधिलकीची आणि शिक्षणविषयक विचारांची प्रेरणा मिळेल, असे आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे म्हणाले. सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला. या कामात तत्कालीन पालकमंत्री अजितदादा पवार यांनी विशेष पाठपुरावा केला, अशी आठवण पांडे यांनी यावेळी सांगितली.
ज्ञानशिल्पांची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
लोकार्पणानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विद्यापीठ परिसरातील सर्व २८ ज्ञानशिल्पांची पाहणी केली. प्रत्येक शिल्पाची माहिती जाणून घेत त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचे विविध पैलू समजून घेतले. या ज्ञानशिल्पांची संकल्पना, त्यामागील उद्देश आणि निर्मितीत सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी कौतुक केले.यावेळी शिल्पकार नवीन शेगमवार, आर्किटेक्ट धनंजय सालकर तसेच यासाठी समितीच्या माध्यमातून कामगिरी केलेले प्रा. डॉ. संजय चाकणे यांचाही विशेष गौरव करण्यात आला. आभार कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी मानले.