झाडीबोलीला मिश्रणाचा दंश नको!

0
5

स्व. हरिदासजी बडोले साहित्यनगरी, सालेकसा (जि. गोंदिया) -शब्दाने साहित्य घडते तर साहित्याने क्रांती. बोलीभाषेची क्रांती झाल्यास त्याचे समाजमनावर तीव्र परिणाम जाणवतात. झाडीबोलीही क्रांतीची परिभाषा व्यक्त करते. या बोलीचा स्वतंत्र इतिहास आहे. तिचा हा आगळा ठेवा कालौघात नष्ट होऊ नये, तिला ‌मिश्रणाचा दंश होऊ म्हणून संमेलनातून उजाळा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक धनंजय ओक यांनी केले. खिलेश महाविद्यालय आणि झाडीबोली साहित्य मंडळ सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने खिलेश महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी २२व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ओक बोलत होते.

व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष म्हणून राजेंद्र बडोले, उद्घाटक आमदार संजय पुराम तर प्रमुख पाहुणे म्हणून झाडीपट्टीचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, हिरामन लांजे, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, ‘झाडीपट्टीच्या बहिणाबाई’ अंजनाबाई खुणे, प्रा. भेलावे, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राकेश शर्मा, लेखक राम महाजन, युवा साहित्यिक मिलिंद रंगारी, नूरजहाँ पठाण यांची उपस्थिती होती.

ओक म्हणाले, प्रत्येक भाषा आपल्या संस्कृतीचे वैभव असते. त्यातून नवा आयाम, स्वभावाचा विराम जपला जातो. ती भाषा साहित्यालाही मोठी करते. नवी ओळख, कला जगाला देते. बोली वाचली तरच भाषा वाचेल, हे शाश्वत सत्य आहे. नवोदित आणि प्रस्थापित साहित्यिकांनी या बोलीची संपत्ती म्हणून जतन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. झाडीबोलीचा बिगुल आज सालेकसासारख्या दुर्गम भागातून फुंकला जात आहे. ही गौरवाची बाब असल्याचेही ते म्हणाले. संमेलनादरम्यान, उपस्थित साहित्यिकांनी आपले विचार प्रकट केले. संचालन युवा साहित्यिक चंद्रकुमार बहेकार यांनी तर आभार प्रा.साखरे यांनी मानले. संमेलनाच्या उद्घाटनानंतर झाडीपट्टीची दंडार व सालेकसा आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थिनीने गोंडी नृत्य सादर केले. दरम्यान, विविध लोककलाही सादर करण्यात आल्या. सकाळी पुस्तपोहा(ग्रंथदिंडी) शहरातून काढण्यात आली होती.