33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय बसपाचे राज्यभरात आंदोलनाचे रणशिंग

बसपाचे राज्यभरात आंदोलनाचे रणशिंग

0
41

blank

नागपूर,दि.23:बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांना राज्यसभेत सहारनपूर विषयावर भाजपच्या खासदार व मंत्र्यांनी बोलू दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या मायावती यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. मायावती यांच्या या अपमानाचा बदला आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या सन्मानार्थ बसपातर्फे राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या २८ जुलै रोजी नागपुरातून या आंदोलनाची सुरुवात होत आहे. परंतु हे आंदोलन केवळ प्रतिकात्मक राहणार नसून, या आंदोलनातून भाजपची पोलखोल करण्यात येणार असून लोकसभा निवडणुकीपर्यंत हे आंदोलन सातत्याने सुरू राहील, असे बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी येथे सांगितले.
बसपाच्या पूर्व विदर्भ विभागाची संघटनात्मक बैठक शनिवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कृष्णा बेले, नानाजी देवगडे, अ‍ॅड. संदीप ताजने, जितेंद्र म्हैसकर, दिलीप मोटघरे, नागोराव जयकर, राजू चांदेकर, विश्वास राऊत आदी व्यासपीठावर होते.विलास गरुड म्हणाले, मायावती यांना बोलण्यापासून रोखणे ही साधी बाब नाही. यामागे मताचे राजकारण आहे. हा केवळ त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नसून तो संपूर्ण दलित, आदिवासी, ओबीसी बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होय. तेव्हा या घटनेचा निषेध म्हणून केवळ कामचलाऊ आंदोलन होणार नाही. त्यासाठी बसपाची खरी ताकद दिसून आली पाहिजे. भाजपाला सत्तेवरून खाली खेचूनच या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. तेव्हा या आंदोलनामुळे भाजपा हादरली पाहिजे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हे आंदोलन चालवण्यात येईल.
पहिल्या टप्प्यात विभागनिहाय धरणे आंदोलन केले जाईल. या आंदोलनाची सुरुवात नागपुरातून होईल, नंतर मराठवाडा व इतर विभागात आंदोलने होतील. त्यानंतर जिल्हानिहाय आंदोलन होतील. आंदोलनाची रूपरेषा ठरवताना संघटन बांधणीवरही लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांनी प्रास्ताविक केले. रूपेश बागेश्वर यांनी संचालन केले. आशिष सरोदे यांनी आभार मानले.भाजप सरकार ठराविक लोकांसाठीच काम करीत आहे. दलित, मागासवर्गीय आदिवासींसाठी भाजपा कोणतेही काम करीत नाही. २०१४ च्या निवडणुकीमध्ये इव्हीएम मशीन मॅनेज केल्यामुळेच भाजपाला यश मिळाले. परंतु २०१९ च्या निवडणुकीत इव्हीएम मशीन मॅनेज नसेल तर भाजपाचा पराभव अटळ आहे, असे बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी स्पष्ट केले.

blank