38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ मशिदीसमोर झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी

मशिदीसमोर झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी

0
23

अमरावती,दि.03- जिल्ह्यातील मोर्शी येथे मशिदीबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.बकरी ईद असल्याने सय्यद शकील हे नमाज अदा करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात सय्यद नूर सय्यद मुसा व सय्यद शकील सय्यद भुरू हे दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून जखमींना उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सय्यद नूर सय्यद मुसा यांच्या कुटुंबीयांचा भंगारचा व्यवसाय आहे. तर अलीम खान व सलीम खान या पिता-पुत्र जुन्या लाकडी दरवाजे, खिडक्यांसह भंगारचा व्यवसाय करतात. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या व्यावसायिक वादातून सय्यद नूर याने अलीम खान याला मारहाण केली होती. यात तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी सय्यद नूरवर गुन्हा दाखल करून त्याची कारागृहात रवानगी झाली होती. दरम्यान शुक्रवारी सय्यद नूर यास जामीन मिळल्याने तो आपल्या घरी परत आला होता. शनिवारी बकरी ईद असल्यामुळे शहारातील बहुतांश मुस्लिम बांधव चांदूरबाजार मार्गावरील मशिदीत जात होते. याच वेळी अलीम खान याचा निकटवर्ती असलेल्या सादिक खान आबीद खान याने साथीदारांच्या सहाय्याने सय्यद नूर सय्यद मुसा व सय्यद शकील सय्यद भुरू या दोघांवर देशी कट्ट्याने गोळीबार केला. यात सय्यद नूर सय्यद मुसा याच्या कमरेच्या मागील बाजूस गोळी लागली. सय्यद शकील सय्यद भूरू यांच्यावर देशी कट्ट्याने हल्ला केल्याने त्यांच्या डोक्यावर जखम झाली. या घटनेची गंभीर दखल घेऊन मोर्शी पोलीसांनी आरोपींचा शोध घेतला, आतापर्यंत या प्रकरणात पोलीसांनी एकूण ६ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

blank