१३ पोलीस जवानांना शौर्य पदक जाहीर

0
20

गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलवाद्यांशी लढा देऊन उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील १३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. शहीद पोलीस हवालदार गणपत नेवरू मडावी यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे, उल्लेखनिय कामगिरी करणारे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक यांना शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. शौर्य पदक जाहीर झालेल्यांमध्ये शहीद नाईक पोलीस शिपाई गिरीधर नागो आत्राम, उपविभागीय पोलीस अधीकारी यशवंश अशोक काळे, पोलीस उपनिरिक्षक प्रकाश व्यंकट वाघमारे, नाईक पोलीस शिपाई सदाशिव लख्मा मडावी, गंगाधर मदनय्या सिडाम, पोलीस शिपाई मुरलीधर सखाराम वेलादी, पोलीस उपनिरिक्षक अतुल श्रावण तवाडे, पोलीस उपनिरिक्षक अंकूश शिवाजी माने, नाईक पोलीस शिपाई विनोद मेसो हिचामी, शहीद पोलीस शिपाई तुकडू मडावी, नाईक पोलीस शिपाई इंदरशाह वासुदेव सेडमेक आदींचा समावेश आहे. याशिवाय गोंदिया जिल्ह्यातील सात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यामध्ये केलेल्या अतुलनिय कामगिरीबद्दल पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले आहेत.

पदकप्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्रकुमार तिवारी, पोलीस उपनिरिक्षक संदीप मस्के, पोलीस उपनिरिक्षक अविनाश अरूण गडाक, पोलीस हवालदार रमेश येडे, नाईक पोलीस शिपाई वामन पारधी, रोधेशाम गाटे, उमेश इंगळे आदींचा समावेश आहे.

हिंदूर जंगल परिसरात झालेल्या चकमकीत पोलीस उपनिरिक्षक अतुल तवाडे व प्रकाश वाघमारे यांनी गौरावस्पद कामगिरी केली. शहीद सुनील मडावी यांनी हिंदूर चकमकीमध्ये शौर्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल त्यांना शौय पदक जाहीर झाले आहे. नक्षलवाद्यांनी ११ मे २०१४ रोजी मुरमुरी जंगल परिसरात पोलीस वाहनाला घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात सुनील मडावी शहीद झाले. शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.