गडचिरोली,दि.16: रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांना कोलकाता येथे ‘देशम’ संस्थेतर्फे आयोजित तिसऱ्या कोलकाता इंटरनॅशनल वाईल्डलाईफ एन्व्हार्नमेंट फिल्म फेस्टीवलमध्ये गोल्डन टायगर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कोलकाता येथे आयोजित एका खास समारंभात सुप्रसिद्ध सिनेअभिनेते खा.चिरंजीव चक्रवर्ती, सिनेअभिनेत्री खा.संध्या मुखर्जी यांच्या हस्ते डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांना गोल्डन टायगर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक आदित्य मुखर्जी, प्रसिद्ध क्रिकेटपटू संबारन बॅनर्जी, चित्रपट निर्मात्या व ग्रीन ऑस्कर विजेत्या अश्विका कपूर उपस्थित होते. केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण समितीच्या सदस्य खा.संध्या रॉय यांच्या हस्ते फेस्टिवलचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी ३०० विद्यार्थ्यांना वन्यजीव व पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. अतिथींनी डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी वन्यजीव व पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. या फेस्टीवलसाठी ११६ देशांमधून सुमारे २३०० चित्रपटांचे नामांकन आले असून, ते १७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.





