
सांगली – माजी उपमुख्यमंत्री आर. आर. ऊर्फ आबा पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय अंजनी अंजनी या त्यांच्या मूळ गावी दाखल झाला आहे. आर. आर. पाटील यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) दुपारी बाराच्या सुमारास अंजनीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आर. आर. पाटील (वय 57) यांचे सोमवारी निधन झाले होते. आबांच्या निधनामुळे राज्य सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. आज सकाळी आर. आर. यांचे पार्थिव मुंबईहून तासगाव येथे आणण्यात आले. तासगावमधील बेलवंडी नाक्यापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. तेथून त्यांचे पार्थिव अंजनी या त्यांच्या गावात आणण्यात आले. त्यांच्यावर होणाऱ्या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी या छोट्या गावात एका सामान्य कुटुंबात आबांचा जन्म झाला होता. आर. आर. पाटील यांच्यातील नेतृत्व गुण हेरून माजी उपमुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी आबांना राजकारणाचे बाळकडू दिले. जिल्हा परिषद ते विधानसभा येथपर्यंतचा प्रवास आबांनी अल्पावधीतच पूर्ण केला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा वारसा नसलेल्या आबांनी महाराष्ट्राची विधानसभा गेल्या 25 वर्षे गाजवली.





