38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Featured News मोदी संसदेत स्वखर्चाने जेवले!

मोदी संसदेत स्वखर्चाने जेवले!

0
39

blank

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवारी) चक्क संसदेच्या कॅन्टीनमध्ये पोहोचले. पंतप्रधान मोदी कॅन्टीनमधील सुविधाचा आढावा घेण्यासाठी नव्हे तर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचले होते. नरेंद्र मोदी यांनी डाळ, भाजी आणि चपाती ऑर्डर केली. भोजनापश्चात त्यांनी मिक्स्ड फ्रूट ज्यूस घेतले. पंतप्रधानांच्या जेवणाचे एकूण बिल 29 रुपये अदा केले.

सरकारी कार्यालयांना अचानक भेट देऊन तपासणी करायची नरेंद्र मोदींची सवय आता सगळ्याच अधिकाऱ्यांना ठाऊक आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांनी ‘सरप्राइज व्हिजिट’ने धक्का दिलाय. या सवयीनुसारच, आज दुपारी ते गुजरातच्या दोन खासदारांसोबत संसदेतील कँटिनमध्ये धडकले. त्यांना पाहून कँटिन कर्मचाऱ्यांचं धाबं दणाणलं. व्यवस्थापकांची तर तारांबळच उडाली. पण, ते तपासणीसाठी आले नसून जेवायला आलेत हे कळल्यावर सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

साधा-सात्विक आहार घेणाऱ्या नरेंद्र मोदींनी व्हेज थाळी मागवली. त्यात साग, कोशिंबीर, डाळ, चपाती आणि भाजी होती. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर मोदींनी बिलाचे २९ रुपये स्वतःच्या खिशातून काढून दिले, तेव्हा कँटिनचे कर्मचारी आणि इतर उपस्थित मंडळीही चकितच झाली. अलीकडच्या काळात कुठलेच पंतप्रधान संसदेच्या कँटिनमध्ये जाऊन जेवल्याचं आपण ऐकलेलं नाही. त्यामुळेच मोदींची ही कँटिनभेट आगळी ठरली.

बराक ओबामाही ‘आम आदमी’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांही अनेक वेळा ‘व्हाइट हाऊस’बाहेरील फूड जॉइण्टवर अचानक भेट देऊन जंक फूडचा आस्वाद घेतात. ओबामा रांगेत उभे राहून ऑर्डर देतात आणि ऑर्डर येईपर्यंत हॉटेलमधील इतर ग्राहकांबरोबर गप्पा मारतात, फोटो काढतात तसेच हॉटेलमध्ये मिळणा-या पदार्थांच्या चवीबद्दलही चर्चा करतात. त्यांच्याकडूनच मोदींना कँटिनभेटीची कल्पना सुचलेली असू शकते.

व्हिजिटर बुकमध्ये लिहिले, ‘अन्नदाता सुखी भव’
दरम्यान, पंतप्रधान संसद परिसरात बनवलेला कक्ष अथवा आपल्या निवासस्थानी जावून लंच घेतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या कॅन्टीनमध्ये पहिल्यांदा लंच घेतले. संसदेत इतर खासदारांसाठी कॅन्टीन बनवण्यात आले आहे. लंच घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी कॅंटीनमधील व्हिजिटर बुकमध्ये ‘अन्नदाता सुखी भव’ अशी प्रतिक्रिया देखील नोंदवली.
दरम्यान, संसद परिसरात पहिल्या मजल्यावर कॅन्टीन आहे. शेजारी असल्याच्या एका खोलीतून जेवन बनवून कॅन्टीनमध्ये आणले जाते. संसदेतील जुनी कॅन्टीन बंद झाली आहे. कॅन्टीनच्या डागडुजीचे कामकाज सुरु आहे. लवकरच ती खासदारांच्या सेवेत सज्ज होईल

blank