
नवी दिल्ली- अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेचा विषय ठरलेले , गेल्या ५६ दिवसांपासून अज्ञात ठिकाणी असलेले कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी सकाळी नवी दिल्लीमध्ये परतले. सकाळी पावणे अकराच्या सुमारास राहुल गांधी यांचे खासगी विमान पालम विमानतळावर उतरल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी पावणेबाराच्या सुमारास राहुल गांधी तुघलक रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
राहुल गांधी हे सुटी संपवून बँकॉकहून भारतात परतल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तसेच प्रियंका गांधी या त्यांना भेटण्यासाठी राहुल यांच्या निवासस्थानी गेल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका, काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका या पार्श्वभूमीवर राहुल गांधी राजकारणात पुन्हा सक्रिय होऊन काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी कॉंग्रेसकडून येत्या रविवारी नवी दिल्लीमध्ये शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी शुक्रवारी काही शेतकऱयांच्याही भेटी घेणार आहेत.





