शायना एन सी यांच्या वडिलांच्या कार्यालयाची तोडफोड

0
7

मुंबई: भाजप प्रवक्त्या शायना एन सी यांचे वडील आणि मुंबईचे माजी नगरपाल (शेरीफ) नाना चुडासमा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.सरकारने मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी प्राईम टाईम अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याविरोधात बॅनर लावल्यामुळे ही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील कार्यालयात बुधवारी ही तोडफोड झाली.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने मराठी सिनेमासाठी मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईम किंवा दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत निर्मात्याच्या इच्छेप्रमाणे शो आयोजित करण्याचा निर्णय घेतला.याला काहींनी विरोध केला आहे.
नाना चुडासमा यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. मराठीचा प्रसार करण्याच्या निर्णयाचं स्वागत, पण आदेश नको, अशा आशयाचे फलक लावले होते.याला विरोध करत काही जण चुडासमा यांच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात घुसले. 10 ते 15 जणांनी काल दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या कार्यालयातील फलक हटवून ते पेटवून दिले. तसंच चुडासमा यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.
कार्यालयात घुसलेले मनसेचे कार्यकर्ते होते, असा दावा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींना तातडीने अटक करू असं अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण) कृष्ण प्रकाश यांनी पीटीआयला सांगितले.या सर्वप्रकाराबाबत भाजप नेत्या आणि चुडासमा यांची कन्या शायना एन सी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, निषेध नोंदवला आहे. “ माझे वडील अशाप्रकारचे बॅनर लिहित असतात. ज्या बॅनरबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे, त्यावर ‘मराठीच्या प्रसाराचं स्वागत, आदेशांचं स्वागत नाही’ असं लिहिलं आहे. त्यामुळे याबाबत चुकीचं काय? हे मराठीविरोधी नाही. तुम्ही 84 वर्षांच्या व्यक्तीच्या कार्यालयात घुसून तोडफोड आणि जाळपोळ कशी काय करू शकता” असं शायना एन सी असे म्हटले आहे.