वाशिम, दि. ०१ : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ०६ पंचायत समितींच्या निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी राज्य निवडणुक आयोगाच्या ३० ऑक्टोबर २०१९ रोजीच्या आदेशानुसार मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ०२ नोव्हेंबर २०१९ रोजी वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ०६ पंचायत समितींच्या निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम जिल्हा परिषद कार्यालय, तसेच संबंधित तहसिल कार्यालय व संबंधित पंचायत समिती कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात येत आहे.
६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करता येतील. हरकती व सूचना संबंधित तहसिल कार्यालयाचे तहसिलदार यांचे कडे दाखल कराव्यात. मतदार यादी तयार करण्याकरिता संबंधीत तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ०६ पंचायत समितींच्या निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणांच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणित करण्याची व मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्याबाबतची सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ आहे. तसेच मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ११ नोव्हेंबर २०१९ रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम जिल्हा परिषद कार्यालय, तसेच संबंधित तहसिल कार्यालय व संबंधित पंचायत समिती कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.




