25.1 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हा प्रशासन ‘मिशन मोड’वर

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हा प्रशासन ‘मिशन मोड’वर

0
59
* जिल्ह्यातील सर्व मंडळातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू; सोयाबीन गंजी, भाजीपाला, फळ पिकांचेही पंचनामे होणार
* निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांसह जिल्हास्तरीय अधिकारी फिल्डवर; शेतकऱ्यांशी साधला संवाद
* नुकसानीचे पंचनामे अचूक व गतीने करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न; तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना
वाशिम, दि. ०१ : जिल्ह्यात अवेळी आलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्वच महसूल मंडळातील ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी संयुक्त पंचनामे सुरू केले असून हे पंचनामे अधिक गतीने व अचूकपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासन ‘मिशन मोड’वर काम करत आहे.
 निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी वाशिम, मंगरुळपीर व मालेगाव तालुक्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पंचनामे होत असलेल्या ठिकाणी जावून आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यांची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेतली. त्याचबरोबर पंचनामे करताना येणारे अडथळे जाणून घेतली. तसेच त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतपिकांची पाहणी करून पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करण्याच्या व हे पंचनामे गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर गावनिहाय पंचनामे करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्रमांक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. कापणी न झालेले सोयाबीन, सोयाबीनच्या गंजी, भाजीपाला, फळपिकांच्या नुकसानीचेही पंचनामे करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील अवेळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे ३३ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला नाही, अशा शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामेही केले जाणार आहेत. त्यानुसार तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामविकास अधिकारी यांनी जिल्ह्यात पिकांच्या पंचनाम्यास सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न झाल्यास याबाबतची माहिती तलाठी, कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.