मुंबई,दि.12: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्यानं आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलचा अहवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवला आहे. राज्यातील सद्यस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी शिफारस राज्यपालांनी केली आहे.
आधी नकार, मग शिफारस केल्याची कबुली
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याचे वृत्त फेटाळून लावले. यानंतर राज्यपालांच्या कार्यालयातून सुद्धा अशा स्वरुपाची शिफारस केली नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याच्या अवघ्या काही मिनिटांतच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली असे स्पष्ट केले आहे.
शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव
तर दुसरीकडे, राज्यपालांनी वेळ वाढवून दिली नाही याविरुद्ध शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. भाजपला राज्यपालांनी 24 तासांपेक्षा जास्त वेळ दिली होती. परंतु, शिवसेनेला केवळ 24 तासांची मुदत देण्यात आली. त्यातही समर्थनाचे पत्र मिळाले नाही असे कारण देत वेळ संपल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. शिवसेनेने बहुमत सिद्ध करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली, ती देखील राज्यपालांनी फेटाळून लावली. हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे असे शिवसेनेचे नेते अनिल परब म्हणाले आहेत.




