
नागपूर,,दि.13ः : वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची प्रतिष्ठित संघटना अकादमी ऑफ मेडिकल सायंसेसच्या नागपूर शाखेद्वारे १४ ते १७ नोव्हेंबर दरम्यान ‘इंटरनॅशनल क्रिटीकल केअर अपडेट’ परिषदेचे आयोजन सेंटर पॉईंट हॉटेल येथे करण्यात आले आहे. मध्य भारतात पहिल्यांच ही आयोजित करण्यात येत आहे. आयएससीसीएमच्या नागपूर शाखेच्या विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला भारतातील तसेच युरोप व ऑस्ट्रेलिया येथील वैद्यकीय अतिदक्षता क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करतील.
जगभरातील वैद्यकीय अतिदक्षता औषधोपचारात झालेली प्रगती व अद्ययावत ज्ञान मध्य भारतातील वैद्यकीय अतिदक्षता तज्ञांपयर्ंत पोहचविणे, हा या परिषदेच्या आयोजनाच्या मागील हेतू आहे. विकसित देशात वैद्यकीय अतिदक्षता क्षेत्रातील ज्ञानाची मध्य भारतातील अतिदक्षता तज्ञांसोबत देवाण-घेवाण झाल्याने येथील रुग्णांच्या आरोग्यासाठी हे सहाय्यभूत ठरणार आहे. आयसीयूमध्ये रुग्णाचा जीव वाचविण्याच्या दृष्टीने महत्वाची माहिती व तंत्रज्ञानावर या परिषदेत चर्चा होईल.
परिषदेपूर्वी विन-फोकस-इंटेंसिव्हिस्ट, एडव्हान्स वेंटिलेशन, हिमोडायनॅमिक मॉनिटरिंग व सीआरआरटी कार्यशाळा यावर मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात येईल.
परिषदेला ऑस्ट्रेलिया येथील डॉ. इयान सेपेल्ट आणि फ्रान्स येथील डॉ. झेव्हिय मॉनेट आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतील. याशिवाय विविध सत्रांमध्ये डॉ. फरहाद कपाडिया, डॉ. अतुल कुळकर्णी, डॉ. राजू सोमन, डॉ. आशिष हेडगे, डॉ. कपील झिपरे, डॉ. शुभल दीक्षित, डॉ. विजया पाटील, डॉ. राजेश मिर्शा, डॉ. प्रदीप भट्टाचार्य मार्गदर्शन करतील. आयोजनासाठी अकादमी ऑफ मेडिकल सायंसेसचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल, सचिव डॉ. संजय जैन, आयएससीसीसीएमचे अध्यक्ष डॉ. जयेश तिमाने, सचिव डॉ. इम्रान नुरमोहम्म्मद, डॉ. राहुल पंडित, डॉ. प्रदीप डिकोस्टा, डॉ. समीर जोग आणि एएमएस व आयएससीसीएम प्रयत्न करीत आहे.





