24.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home राष्ट्रीय देश पवारांनी मोदीकंडे मांडला अवकाळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रश्न

पवारांनी मोदीकंडे मांडला अवकाळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रश्न

0
15

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, दि. २० :  – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यात सध्या असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. दरम्यान, या भेटीमध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न आपण पंतप्रधान मोदींकडे मांडला. तसेच या नुकसानीकडे मोदींचे लक्ष वेधल्याचे शरद पवार यांनी ट्विटरवरून सांगितले. मात्र या भेटीदरम्यान कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कैफियत मांडली. पवारांनी आपण राज्यातील दोन जिल्ह्यांचा दौरा करून पाहणी केली. परंतु, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यभर शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी सध्या गोळा केली जात असून लवकरच आपल्यासमोर मांडली जाईल असे पवार म्हणाले. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. अशात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन तातडीने लक्ष घालणे अतिशय महत्वाचे आहे. आपण तातडीने यासाठी उपाय आणि मदत केल्यास आपला आभारी राहील असे पवारांनी म्हटले आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात अकल्पनीय असे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा फटका ३२५ तालुक्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळे ५४.२२ लाख हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. ही बाब मी मोदींच्या कानावर घातली आहे.’’या महिन्याच्या सुरुवातीला मी नाशिक आणि विदर्भाच्या दौऱ्यावर जात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले होते. परतीच्या पावसामुळे राज्यातील बहुंतांश भागात सर्व प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे, याकडे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधले, असे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार यांनी ही भेट आटोपल्यानंतर या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले. मात्र शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातील बैठक आटोपल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी तातडीने मोदींची भेट घेऊन चर्चा केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.