
गोंदिया,दि.12ः-तालुक्यातील रावणवाडी येथे महालक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक योगेश रोकडे यांच्या कारच्या काचा फोडून कारच्या आतमध्ये ठेवलेले पावणेसहा लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी ९ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून येथील व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास महालक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक योगेश रोकडे यांनी दरदिवशीप्रमाणे आपले दुकान बंद करुन सोन्याचांदीचे दागिने बॅगेत ठेवून आपल्या कार क्रमांक एम.एच.३५/ए.जी. ४0३८ मध्ये ठेवले. व त्यांच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या सलूनच्या दुकानात ते केस कापण्यासाठी गेले असता चोरट्यांनी डाव साधत रोकडे यांच्या वाहनाच्या काचा फोडून वाहनात ठेवलेले ५ लाख ७५ हजार रुपये 0कमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरी केले. दरम्यान, सलुनमधून केस कापल्यानंतर ते आपल्या कारजवळ येऊन गोंदियाला घरी जाण्यासाठी रवाना झाले. तेव्हा कार चालवित असताना त्यांना कारच्या मागील बाजूचा काच फुटल्याचे दिसले. यावेळी दागिने ठेवलेली बॅग पाहिली असता त्यांना बॅग दिसून आली नाही. त्यामुळे बॅग चोरी गेल्याचे लक्षात येताच त्यांनी कार पलटवून रावणवाडी पोलीस ठाणे गाठले व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान, रावणवाडीच्या ठाणेदारांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेता गुन्हा नोंद केला व दोन पथके तयार करून तपास कायार्साठी जिल्हा सिमेला लागून असलेल्या छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यात पाठविले आहे. उल्लेखनीय म्हणजे, रावणवाडी हे गाव गोंदिया-बालाघाट या मुख्य मार्गावर असून वर्दळीचे ठिकाण आहे. अशात चोरांकडून करण्यात आलेल्या या चोरीमुळे येथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून विशेषत: व्यवसायीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी केली आहे.





