गोंदिया,दि.२६ः- गोंदिया जिल्हा हौसी सायकल पोलो असोसिएशन, ऑल महाराष्ट्र सायकल पोलो असोसिएशन व सायकल पोलो फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने २३ व्या ज्युनिअर मुली व २१ व्या सिनिअर महिला राष्ट्रीय सायकल पोलो स्पधेर्चे आयोजन २६ ते २९ डिसेंबरदरम्यान गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय सायकल पोलो महासंघाचे महासचिव छत्रपती पुरस्कार प्राप्त गजानन बुरडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्पर्धेचे उद््घाटन २६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार असून, समारोप २९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार असल्याचे बुराडे यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेला जिल्हा सायकल पोलो असोसिएशनचे उपाध्यक्ष गजेंद्र फुंडे, सचिव महेंद्र हेमणे, सदस्य रंजीत गौतम उपस्थित होते. गजानन बुराडे यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड नुकतीच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे झालेल्या राज्य स्पर्धेत करण्यात आली. खेळाडूंची निवड निवड समितीचे सदस्य दिनेश सार्वे, स्पप्नील रेवतकर, उत्तम इटनकर, नारायण बत्तुले, नितीन जाधव यांनी केली. राज्य सबज्युनिअर संघात सृष्टी धोबे (कर्णधार), ओनस्वी निनावे, आस्था मानकर, राजनंदिनी हिंगभिरे, जान्हवी भडे, निसर्ग देशमुख, सलोनी इंगोले व कस्तुरी बर्वे या खेळाडूंचा समावेश असून या संघाचे प्रशिक्षक प्रणिता चिंतलवार व व्यवस्थापक जयंत मानकर आहे. तसेच ज्युनिअर संघात खुशी देशमुख (कर्णधार), राधिणी दारुंडे, रसिका सोमकुवर, जान्हवी पटले, आसावरी बिसने, सलोनी झोंबाडे, वैदेही इंगोले, लचिक वाणी या खेळाडूंचा समावेश असून प्रशिक्षक दीक्षा गवई व व्यवस्थापक नितीन जाधव आहेत. सिनिअर संघात अमिशा चवरे (कर्णधार), अपूर्वा चवरे, खुशी देशमुख, राधिणी दारुंडे, रसिका सोमकुवर, नूतन देशमुख, रुतिका गायकवाड, कांचन उबनाड या खेळाडूंचा समावेश असून प्रशिक्षक तृप्ती ठाकरे व व्यवस्थापक नारायण बत्तुले आहेत.
स्पर्धेत यजमान महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गोवा, उत्तरप्रदेश, झारखंड, बंगाल, जम्मू काश्मिर, तामिलनाडू, केरळ, पांडेचरी, राजस्थन, पंजाब, हरियाणा, दिल्ली, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, चंडीगड, आसाम, मणिपूर, उत्तराखंड, गुजरात, दिवदमण, आंध्रप्रदेश, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, बिहार, ओरिसा आदी राज्याचे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी खेळाडू, अधिकारी व पदाधिकार्यांच्या भोजन व निवास व्यवस्था असोसिएशनच्या वतीने शहरातील विश्रामगृह, हॉटेल्स व समाजभवनात करण्यात आली आहे. स्पधेर्तील विजेत्या, उपविजेत्या व तृतीय स्थानाच्या संघाना चषक, पदके, मेरिट सर्टीफिकेट व अन्य सहभागी खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी व पदाधिकार्यांना सहभाग प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धा सकाळी ८.३0 ते सायंकाळी ५.३0 या वेळेत घेण्यात येणार आहे.





