32.6 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home क्रीडा आलापल्लीच्या रोहित राठोडची इंग्लंडच्या ‘डरहम क्रिकेट बोर्डा’कडून निवड!

आलापल्लीच्या रोहित राठोडची इंग्लंडच्या ‘डरहम क्रिकेट बोर्डा’कडून निवड!

0
5
गडचिरोली: जिद्द आणि कष्टाच्या जोरावर गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील रोहित राठोड या तरुण क्रिकेटपटूने थेट इंग्लंडची वारी निश्चित केली आहे. आयपीएलमध्ये ‘राजस्थान रॉयल्स’चा नेट गोलंदाज म्हणून छाप पाडल्यानंतर, आता रोहितची इंग्लंडमधील प्रतिष्ठित अशा ‘डरहम क्रिकेट बोर्डा’तर्फे काउंटी क्रिकेट ट्रायल्स आणि नेट गोलंदाज म्हणून अधिकृत निवड झाली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
रोहित हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून, त्याच्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीने निवडकर्त्यांना प्रभावित केले आहे. त्याच्या निवडीचा प्रवास हैदराबाद येथील ‘आर्मड फोर्सेस’च्या ट्रायल्सपासून सुरू झाला. तिथे आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेत त्याने डरहम क्रिकेट बोर्डाचे निमंत्रण मिळवले. रोहितचे वडील वन विभागात कार्यरत असून, लहानपणापासूनच खेळाची प्रचंड आवड असलेल्या रोहितने महाविद्यालयीन स्तरावरून आपल्या क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली होती.
डरहम क्रिकेट बोर्डाच्या पत्रानुसार, ६ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत इंग्लंडमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यांसाठी आणि नेट प्रॅक्टिससाठी रोहितची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्याचा संपूर्ण खर्च व्यवस्थापनातर्फे केला जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळालेल्या या संधीमुळे आलापल्ली परिसरातील क्रिकेट वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, रोहितवर सध्या सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.